पाथरी (जि़ परभणी) : पैठण येथील जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी सोडण्यात येणा-या पाण्याच्या अवर्तनाचे नियोजन कोमलडले आहे. रबी हंगामाच्या पेरणीसाठी शेतक-यांनी मशागती करून ठेवल्या आहेत. परंतु, जिल्ह्यामध्ये पाणीच दाखल झाले नसल्याने पेरण्या लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातील वरखेड येथील वितरिका क्रमांक २२२ पासूून सुरू होतो. मुख्य डाव्या कालव्यावर पाथरी आणि मानवत तालुक्याचा अर्धा भाग येतो. पाथरी उपविभागांतर्गत पाथरी, बोरगाव, गुंज, बाभळगाव ४, बाभळगाव ५, हादगाव, केकरजवळा या सात शाखा आहेत. जायकवाडी धरणातून २०१० साली दोन्ही हंगामासाठी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर सात वर्षानंतर यावर्षी जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे. मधल्या काळात प्रवाही सिंचन खंडीत झाले होते. यावर्षी धरण भरल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दोन्ही हंगामासाठी पाणी मिळणार असल्याने शेतक-यांनी पेरणीचे नियोजन केले आहे.
आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हंगाम सुरू होत असल्याने या काळात जमिनीला पाण्याची आवश्यकता लागते. जायकवाडी धरणाच्या पाण्याच्या अवर्तनासंदर्भात औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात २६ आॅक्टोबर रोजी परभणी, जालना आणि औरंगाबाद विभागातील अधिकाºयांची बैठक झाली होती. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात लागणाºया पाण्याचा आढावा घेण्यात आला होता. मात्र पुढील नियोजनासंदर्भात कालवा समितीची बैठकच झाली नाही. त्यामुळे पाणी सोडण्याचे नियोजन लांबले आहे. मुंबई येथे १३ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक झाली असली तरी यासाठीचे जाहीर प्रगटन जायकवाडी विभागाकडून प्रसिद्ध झाले नाही. त्यामुळे शेतक-यांना अजूनही पाण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. गोदावरी नदीपात्रातील पाथरी तालुक्यातील दोन्ही बंधारे तुडूंब भरली आहेत. त्याच बरोबर जायकवाडीचे पाणी मिळणार असल्याने जवळपास १० हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. मात्र सध्या तरी नियोजन होत असल्याने बारमाही पीक तसेच रबी पीक अडचणीत सापडले आहेत.
वितरिका नादुरुस्तजायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडले आहे. याच बरोबर कालव्यामध्ये काळही साचला असून ठिकठिकाणी वितरिका नादुरुस्त आहेत. यामुळे पाणी सोडल्यास शेतक-यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचेल किंवा नाही? याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे वितरिका दुरुस्त कराव्यात, अशी मागणीही होत आहे.
उसाचे क्षेत्र वाढणारजायकवाडीच्या डाव्या कालव्यावर पाथरी आणि मानवत तालुक्यातील अर्धा अधिक भाग येतो. जायकवाडीचे पाणी सोडले जाणार असल्याने या भागातील शेतक-यांनी ऊस लागवडीचे नियोजन केले आहे. पाथरी तालुक्यातील लिंबा आणि पाथरी येथील दोन्ही खाजगी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी पाणी सुटण्याची प्रतीक्षा करीत आहेत.