जिंतूर ( परभणी): औद्योगिक वसाहतीच्या निवडणूक प्रक्रिया दरम्यान माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व माजी आमदार विजय भांबळे हे दोघे समोरासमोर आल्याने बाचाबाची झाली. वाद वाढत गेल्याने दोन्ही गटात हाणामारी व दगडफेक झाली. दरम्यान, दगडफेकीत एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
सकाळी आठ वाजता औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दरम्यान, मतदारांना काही कार्यकर्त्यांनी ओळखपत्र दाखवा म्हणून हट्ट धरला. त्यामुळे वाद निर्माण झाला आणि बोर्डीकर- भांबळे या दोन्ही गटाकडून कार्यकर्ते जमा झाले.
यावेळी स्वतः माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व माजी आमदार विजय भांबळे दोघेही समोरासमोर आले. वाद वाढत गेल्याने कार्यकर्त्यांनी हाणामारी करत अचानक दगडफेक सुरू केली. जमाव पांगविण्याचा प्रयत्न करत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड सह एक पोलीस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले. तर अनेक कार्यकर्त्यांना ही मार लागला. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला शिवाय अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या शहरात तणावपूर्ण पूर्ण शांतता असली तरी दोन्ही बाजूने मोठा जमाव जमलेला आहे.