परभणी: केंद्र शासनाचा विकसित भारत संकल्प यात्रा रथ कार्यक्रम सुरू असताना अज्ञात दहा ते बारा अनोळखी नागरिकांनी गैर कायद्याची मंडळी जमून आपसात वाद करत एकमेकास शिवीगाळ व मारहाण केली. खुर्च्या फेकण्यास सुरुवात करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ११ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विविध योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांपर्यंत लाभ पोहोचण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचे परभणी जिल्ह्यात २४ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जाऊन लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने १७ डिसेंबर रोजी परभणी तालुक्यातील पेडगाव येथे सकाळी ९ वाजता विकसित भारत संकल्प यात्रा रथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती.
विशेष म्हणजे या कार्यक्रमास केंद्राचे उपसचिव गिरी यांची उपस्थिती राहणार होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर झाल्या. परंतु कार्यक्रम सुरू होताच सेल्फी पॉईंटवरून झालेल्या वादाचे रूपांतर शिवीगाळ व धक्काबुकीत झाले. त्यानंतर खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. परिणामी, प्रशासनाला हा कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यानंतर गटविकास अधिकारी दीपा बापट यांनी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी पेडगाव येथील अज्ञात दहा ते अकरा नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दहा ते बारा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून आपसात वाद केला. एकमेकांना शिविगाळ व मारहाण करत शासकीय कर्मचारी व नागरिकांच्या अंगावर खुर्च्यांची फेकाफेक करून दहशत निर्माण केल्याची फिर्याद ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. याप्रकरणी अज्ञात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांंनी शंका दुर करणे गरजेचेविकसित भारत संकल्प यात्रा रथ अभियानांतर्गत पेडगाव येथे रविवारी मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांचा गोंधळ थांबून त्यांच्या शंकेचे निरासन करणे गरजेचे होते. परंतु तसे न होता हा कार्यक्रम रद्द करून परभणीचा रस्ता धरला. त्यानंतर अज्ञात ११ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. परंतु या ठिकाणी उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थित ग्रामस्थांचा शंकेचे निरासरण करणे गरजेचे असताना ते करू शकले नाही, अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.