पाथरी : तालुक्यातील खेडुळा येथे १७ जानेवारी रोजी भरलेल्या अवैध जातपंचायतीत राडा होऊन दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात एका जीपच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
खेडुळा शिवारात रविवारी सायंकाळच्या कैकडी समाजातील ग्रामस्थांची अवैधरीत्या जातपंचायत भरविण्यात आली. याचवेळी आपसात भांडणे होऊन एकमेकांना काठी, लोखंडी पाईप व कत्तीने मारहाण झाली. ही माहिती मिळाल्यानंतर पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन सैदाने, सहायक पोलीस उपनिरीक्षक राऊत, जाफर, पोलीस कर्मचारी क्षीरसागर, आदी कर्मचारी सायंकाळी ६ च्या सुमारास गावात दाखल होताच जात पंचायतमध्ये मारहाण करणारे आरोपी तेथून पळून गेले. यावेळी एक मॅक्स जीप (क्र. एम.एच.२२/जे.यू २०९५) व एम.एच.०२, एम.एच.२२/एजी ५३१५२, एम.एच.१४/बीपी ५६४२ या क्रमांकाच्या दुचाकी मिळून आल्या. तसेच मारहाणीसाठी वापरलेल्या काठ्या, लोखंडी पाईप व एक कत्ती पोलिसांनी जप्त केली आहे.
या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक इमदादुल्लाखाँ वहीदूल्लाखाँ पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एका महिलेवर झालेल्या अत्याचाराचा निवाडा करण्यासाठी रविवारी कैकाडी समाजाची जातपंचायत भरविली होती. त्यात लक्ष्मण गोविंद गायकवाड, विजू लक्ष्मण गायकवाड, सचिन त्र्यंबक जाधव, अनिल लक्ष्मण गायकवाड (सर्व रा. गंगाखेड), विकास गणपत जाधव, महादू तुकाराम जाधव, विनोद भिकाजी जाधव, सखाराम श्रीपती जाधव, तुकाराम श्रीपती जाधव (सर्व रा.पाथरी), विनायक यनाप्पा गायकर, बापूराव जाधव, लक्ष्मण जाधव, कारभारी जाधव, सचिन रूस्तुम जाधव, चिवळ्या प्रकाश जाधव, लालन तुकाराम पवार, नीलेश रामप्रसाद जाधव, शालुबाई उत्तम जाधव, पारुबाई प्रकाश जाधव, ध्रुपताबाई रुस्तुम जाधव, प्रकाश उत्तम जाधव, भागीत्रा उत्तमराव जाधव, आशामती कैलास जाधव, उधाबाई रूस्तुम जाधव आणि इतर २० ते २५ जण एकत्र आले होते. जातपंचायतीदरम्यान वाद झाला आणि त्यानंतर ही मारहाण झाल्याचे म्हटले आहे. त्यावरून वरील आरोपींसह इतर २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाली नाही.