परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ पाथरी येथे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होती. या सभेत मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर हल्ला चढवत जोशपूर्ण भाषण केले. मात्र जोशात केलेल्या या भाषणात त्यांनी राहुल गांधी आणि राष्ट्रवादीबाबत चुकीची माहिती दिल्याचे आता समोर आले आहे.
भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, गरिबी हटावचा मुद्दा मांडत असताना,'राहुल गांधी यांचे पंजोबा पंतप्रधान झाले, आजी पंतप्रधान झाल्या, वडील पंतप्रधान झाले अन् आईही पंतप्रधान झाल्या' असा उल्लेख केला. प्रत्यक्षात सोनिया गांधी या पंतप्रधान झालेल्याच नाहीत.
दुसरा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा दिला. या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीने पाकसोबत चर्चा केली पाहिजे, असे नमूद केले असल्याचे सांगताना आरे कशाची चर्चा करता, ते तुम्हाला किड्या-मुंग्यासारखे मारतात आणि तुम्ही तेथे बिर्याणी खाता, लाज वाटत नाही तुम्हाला, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेता पाकिस्तानमध्ये बिर्याणी खायला गेला नव्हता. हे संदर्भ चुकीचे असल्याचे मुख्यमंत्र्यांची सभा संपताच समोर आले. यामुळे मुख्यमंत्र्यांची भर सभेतील 'गलती से मिस्टेक' आता चांगलीच चर्चेची ठरत आहे.