परभणी: शहरातील एका बंद दाल मिलमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी रात्री पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून १२ प्रतिष्ठित व्यक्तींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड रोडवर जुगल दरक यांच्या बंद असलेल्या दाल मिल परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकास मिळाली. त्यानुसार बुधवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपी जुगल किशोर दरक ( रा.नवा मोंढा,परभणी), सुनील श्रीकिशन मोदानी (रा.खानापूर फाटा, परभणी), लक्ष्मीकांत श्रीधरराव कुलथे (परभणी), अमोल रमेश राठी (रा. परसावत नगर, परभणी), दत्ता शंकराप्पा मुखरे (विकास नगर, परभणी), राहुल राधाकिशन भंडारी (परसावत नगर, परभणी), जयप्रकाश शिवप्रकाश लड्डा (नवा मोंढा, परभणी), राज गोपाल कासट (सेलू कॉर्नर, पाथरी), चेतन बन्सीलाल मुंदडा, (स्टेशन रोड, परभणी), राजू नारायण गव्हाणे (महात्मा गांधी नगर, परभणी), सोपान वसंतराव देशमुख (त्रिमूर्ती नगर, परभणी), रितेश कांतीलाल झांबड (सुपर मार्केट, परभणी) यांच्याकडून एकूण ८ लाख ६ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींना परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्रीच हजर करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आर. रागासुधा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहा. पोलीस निरीक्षक एच.जी पांचाळ, सहा.पोलीस उपनिरीक्षक हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, श्रीकांत घनसावंत, अतुल कांदे, पुजा भोरगे व चालक वानोळे यांनी केली.