मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ५० पेक्षा जास्त युवकांनी बलिदान देऊन मिळविलेले एसीबीसी मराठा आरक्षण न्यायालयात टिकवण्यास राज्य शासन अपयशी ठरले असून त्यामुळे मराठा समाजाचे वाटोळे झाले आहे. याला जबाबदार राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारसुद्धा आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोष पसरला असून चीड निर्माण झालेली आहे. राज्य व केंद्र सरकार आरक्षणाच्या दिशेने ठोस पावले उचलत नसल्याने आता आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे संभाजी सेनेच्या वतीने २ जुलैपासून आक्रमकपणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेण्यात येणार आहे. २ जुलै रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही राज्य शासनाने हा प्रश्न सोडविला नाही, तर केंद्र व राज्यातील एकाही मंत्र्यांना फिरू देणार नसल्याची माहिती संभाजी सेनेचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी दिली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, रवीकुमार सोडतक्र, सखाराम काळे, नितीन निकम, भानुदास बिरादार, कृष्णा देशमुख, विठ्ठल तळेकर, अरुण पवार, सुधाकर सोनवणे, भारत वालेकर, वैभव गाडेकर,ओम लड्डा, गजानन लव्हाळे आदींची उपस्थिती होती.
मराठा आरक्षणासाठी संभाजी सेनेच्या वतीने रेल रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:12 AM