परभणी, दि. 1: रेल्वे स्थानकापासून २०० मीटर अंतरावर विद्यापीठ गेटजवळ एका मालगाडीचे इंजिन घसरल्याने रविवारी सकाळपासून रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे़. रेल्वे प्रशासनाने इंजिन पटरीवर घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले असून, एकाच प्लॅटफॉर्मवरून सध्या वाहतूक सुरू करण्यात आली आहे़.
मनमाडहून निघालेली मालगाडी परभणी रेल्वेस्थानकावर रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास पोहचली़. ही मालगाडी पुढे नांदेडकडे जात असताना साधारणत: पावणे नऊ वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या विद्यापीठगेटजवळ मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरले़. त्यामुळे मनमाडकडे जाणा-या आणि नांदेडकडे जाणा-या रेल्वे गाड्याची वाहतूक ठप्प पडली़ ९ वाजेपासून ठप्प झालेली ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे़.
इंजिन रुळावर घेण्यासाठी नांदेड येथून अधिकारी आणि कर्मचारी परभणीत दाखल झाले आहेत़ सुमारे २५० कर्मचारी यासाठी प्रयत्न करीत आहेत़. नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक एक़े़ सिन्हा हे देखील परभणीत दाखल झाले. असून, कामकाजावर नियंत्रण ठेवून आहेत़ दुपारी १२ वाजेपर्यंत काम सुरू होते़. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तीन पैकी एका प्लॅटफॉर्मवरील वाहतूक सुरू केली आहे़. १२.१५ वाजेपर्यंत ही वाहतूक सुरळीत झाली नव्हती़ पूर्णा रेल्वे स्थानकावर अनेक गाड्या थांबून ठेवल्या होत्या़ त्यात नांदेड-पुशपूल, लोकमान्य टिळक एक्सप्रेस, अकोला-परळी एक्सप्रेस या गाड्या सकाळी ११ वाजेपर्यंत पुर्णेच्या रेल्वे स्थानकावरच होत्या़ दरम्यान, घटनेमुळे प्रवाशांची तारांबळ उडाली़.