परभणी : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पावसाने वेग घेतला असून, ५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सर्वदूर दिवसभर पावसाची रिपरिप होती. त्यामुळे बाजारासाठी शहरात येणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात दमदार पाऊस झाला आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यांतच वार्षिक सरासरीच्या ७५ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात २० दिवस पाऊस गायब झाला होता. मात्र, आता पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून, रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे. परभणी शहर परिसरात रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. दुपारी ३ वाजेनंतर मात्र पावसाची रिपरिप सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस बरसला.
सोमवारी जिल्हाभरात पोळ्याचा सण साजरा केला जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी रविवारीच तयारी केली. सायंकाळच्या सुमारास रीतीरिवाजाप्रमाणे बैलांची खांदेमळणी केली जाते. पावसामुळे त्यात अडथळे निर्माण झाले. मात्र, पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलले आहे. जिल्ह्यात दरवर्षीच्या पावसाळ्यात ७६१ मि.मी. पाऊस होतो. शनिवारपर्यंत ७४७ मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यात पाथरी तालुक्यात ११८ टक्के, जिंतूर १०१, पालम ११, सोनपेठ १०५ आणि मानवत तालुक्यात १०२ टक्के पाऊस झाला आहे.