परभणी : आज सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, जिल्हाभरात सर्वदूर पाऊस सुरू झाला आहे.
जिल्ह्यात आठ दिवसानपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र मोठा पाऊस होत नसल्याने शेतकरी चिंतेत होते. आज पहिल्यांदाच जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासूनच मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे नोकरदार मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली. रेनकोट, छत्र्यांच्या आधार घेऊन अनेकांना कार्यालय गाठावे लागले.
दरम्यान, हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर होत आहे. परभणी शहरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पिकांना पोषक असा पाऊस होत असला तरी जलसाठा वाढण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्प कोरडेठाक आहेत. मोठा पाऊस झाला तरच या प्रकल्पांत पाणीसाठा जमा होणार असल्याने नागरिक दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.