परभणी : जिल्ह्यात यावर्षी पावसाने कहर केला असून, मागील पाच दिवसांपासून सतत पाऊस होत असल्याने गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांसह ओढे आणि नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७६१ मि.मी. पाऊस होतो. यंदा मात्र रविवारपर्यंत तब्बल १ हजार १३ मि.मी. पाऊस पडला आहे.
यावर्षी पावसाळ्यात जून महिन्यापासूनच पाऊस होत आहे. प्रत्येक महिन्यात पावसाची नोंद होत असून, यावर्षीची सरासरी पावसाने कधीच ओलांडली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच १ हजार मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाथरी, सेलू, मानवत आणि पालम या चार तालुक्यांत १ हजार मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. रविवारी धुवाधार पावसाने हजेरी लावली. जिंतूर तालुक्यातील येलदरी व परिसरात सतत होत असलेल्या पावसामुळे केहाळ गावाजवळील ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पालम तालुक्यातील लेंडी नदीला २५ सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या पावसाने पूर आला. यामुळे दहा गावांचा संपर्क तुटला होता. २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत तरी संपर्क पूर्ववत झाला नव्हता. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव महाविष्णू शिवारात मुसळधार पावसाने ओढ्याला पूर आला.
दरम्यान, जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. दैठणा, पोखर्णी, ताडकळस, एरंडेश्वर, बनवस, गंगाखेड तालुक्यातील खळी व अन्य गावांमध्ये पाऊस पडला. सतत होत असलेल्या पावसामुळे पिकांची मोठी हानी झाली आहे.
ढालेगाव, डिग्रस बंधाऱ्यातून विसर्ग
पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याचे ८ दरवाजे उघडून ५८ हजार २७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्याचप्रमाणे पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे ३ दरवाजे उघडून ७४ हजार ८३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जात आहे. येलदरी प्रकल्पाच्या दहाही दरवाजांतून रविवारी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पूर्णा नदीला पूर आला आहे.