लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोमवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्या-नाल्यांना पाणी आले असून, हा पाऊस प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यासाठी पोषक ठरणार आहे़जुलै महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती़ १६ आॅगस्ट रोजी पावसाचे पुनरागमन झाले़ मात्र एकच दिवसच हा पाऊस बरसला़ त्यानंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या़ दरम्यान, २० आॅगस्ट रोजी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकºयांच्या चिंता दूर झाल्या आहेत़ परभणी शहर व परिसरात पहाटे पावसाला सुरुवात झाली़ सुरुवातीला रिमझिम पाऊस झाला़ सकाळी १० वाजेनंतर मात्र पावसाचा जोर चांगलाच वाढला़ दुपारी २ वाजेपर्यंत शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला़ दुपारी ३ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता़ परभणी शहराबरोबरच जिंतूर, मानवत, पालम, सोनपेठ, पूर्णा, सेलू तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे़ सर्वदूर पाऊस होत असल्याने शेतकरी सुखावले आहेत़ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अजूनही कोरडे असून, या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे़सोनपेठमध्ये विक्रेत्यांची गैरसोयसोनपेठ: तालुक्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने आठवडी बाजारात शुकशुकाट होता़ त्यामुळे भाजी विक्रेत्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला़सोमवारी सोनपेठ येथे आठवडी बाजार भरतो़ या बाजारात तालुक्यातील ६० गावांसह पाथरी, परळी तालुक्यातील शेतकरीही भाजी, फळे विक्रीसाठी येतात़ प्रत्येक आठवड्यात लाखो रुपयांची उलाढाल होते़ २० आॅगस्ट रोजी मात्र सकाळपासून पाऊस असल्याने आठवडी बाजारात ग्राहक फिरकलेच नाहीत़ त्यामुळे विक्रीसाठी आणलेला भाजीपाला जागेवरच फेकून द्यावा लागला़पाथरी तालुक्यात रिमझिमपाथरी : पाथरी तालुक्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती़ त्यामुळे शेती कामात व्यत्यय निर्माण झाला़ या पावसामुळे चिभड्या जमिनीवरील पिके धोक्यात येण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे़‘निम्न दूधना’त तीन दलघमीची वाढसेलू : तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून पाऊस होत असून, सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती़ या पावसामुळे निम्न दूधना प्रकल्पात पाण्याची आवक वेगाने होत असून, प्रकल्पाच्या पाणी पातळीत ३ दलघमीने वाढ झाली आहे़तालुक्यामध्ये सोमवारी दिवसभर पाऊस झाला़ रविवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी दिवसभर बरसला़ आधून-मधून मध्यम स्वरुपाचा पाऊसही झाला़ दुपारी एक तास जोरदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे़ दरम्यान, या पावसामुळे ओढे, नाले खळखळून वाहत आहेत. कसुरा नदीही प्रथमच वाहू लागली़ दरम्यान, निम्न दूधना प्रकल्पामध्ये वेगाने पाण्याची आवक होत असून, प्रकल्पाची पाणी पातळी ३ दलघमीने वाढली आहे़ सध्या या प्रकल्पात १५५ दलघमी पाणीसाठा झाला आहे़गोदावरीच्या पाणी पातळीत अंशत: वाढपूर्णा- तालुक्यात रविवारी सायंकाळपासून होत असलेल्या पावसामुळे गोदावरी, पूर्णा, थुना नद्यांच्या पाणीपातळीत अंशत: वाढ झाली आहे़ या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांना जीवदान मिळाले असले तरी सोमवारच्या जोरदार पावसामुळे कापूस पीक उन्मळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे़ काढणीसाठी आलेल्या मूग व उडीद या पिकांना मोड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़भिंत कोसळलीपूर्णा तालुक्यात पावसामुळे थुना नदी दुथडी भरून वाहत आहे़ सायंकाळी ७ वाजेपर्यंत नदीपात्रात पाण्याची आवक सुरू होती़ नदी काठावर असलेल्या नावकी व मालेगाव या दोन गावांच्या शिवेपर्यंत नदीचे पाणी पोहचले होते़ त्यामुळे गावालगत असलेल्या शेती पिकातही पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे़ नावकी येथे शेत आखाड्यावर एका कच्च्या बांधकामाची भिंत पावसामुळे कोसळली़ सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही़पुरामुळे शेतकरी अडकले आखाड्यावरपूर्णा- तालुक्यातील आहेरवाडी गावाच्या शिवार परिसरात असलेल्या ओढ्याला पूर आल्याने अनेक शेतकरी आखाड्यावर अडकले आहेत़ तसेच आहेरवाडी या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे़ रविवारी रात्रीपासून तालुक्यात पाऊस होत असल्याने आहेरवाडी या गावालगत असलेल्या कामाई ओढा, थुना नदी व वडगाव ओढ्याला पूर आला़ सजगीर देवस्थानापासून वाहणारी थुना नदी आणि पुर्णेकडे येणाºया रस्त्यावरील कमाई ओढा व वडगावकडे जाणाºया ओढ्याला पाणी आल्याने हा मार्ग सकाळी ११ वाजेपासून बंद झाला आहे़ त्यामुळे आहेरवाडी या गावातील एकही नागरिक गावाबाहेर पडू शकला नाही़ तर भल्या पहाटे शेतात गेलेले शेतकरी आखाड्यावरच अडकून पडले आहेत़आलेगाव : सहा गावांचा संपर्क तुटलाआलेगाव- आलेगाव व परिसरात सकाळी १० वाजेपासून पावसाची रिपरिप सुरू असून, यामुळे चार गावांचा आलेगावशी संपर्क तुटला आहे़ परिसरात होत असलेल्या पावसामुळे कलमुला, चांगेफळ नद्यांना पूर आला आहे़ त्यामुळे पिंपरण- आलेगाव व चांगेफळ -आलेगाव हे दोन मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाले आहेत़ पिंपरण येथील ग्रामस्थांना आलेगाव साधारणत: १ किमी अंतरावर असताना रस्ता बंद झाल्याने नाव्हेश्वर मार्गे १० किमीचा वळसा घालून आलेगाव गाठावे लागत आहे तर कलमुला, चांगेफळ येथील ग्रामस्थांना चुडावामार्गे आलेगावला यावे लागत आहे़ आलेगाव, पिंपरण, कलमुला, पिंपळा भत्या या गावांचा संपर्क ठप्प झाला आहे़सतर्कतेचा इशारागोदावरी, पूर्णा, थुना नद्या दुथडी भरून वाहत आहेत़ हवामान खात्याने आगामी दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे़ तेव्हा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी केले आहे़
परभणी जिल्हाभरात दिवसभर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:58 AM