परभणी : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशाप्रमाणे राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा निर्णय घेणार असून, शेवटच्या क्षणी याबाबत भूमिका जाहीर करणार असल्याचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले.
राज्यातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. १० जूनला यासाठी मतदान होत आहे. भाजपा आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये ही लढत होत असून, लहान-मोठ्या पक्षांचा प्रत्येक आमदार या निवडणुकीसाठी महत्त्वाचा झाला आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, आमचे पक्षश्रेष्ठी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आहेत. त्यांच्याशी आपला अद्याप संपर्क झालेला नाही. ते जो आदेश देतील, त्यानुसार निर्णय घेतला जाईल, राज्यसभा निवडणुकीसाठी गोपनीय मतदान आहे.
त्यामुळे आताच कोणाला पाठिंबा द्यायचा हे सांगता येणार नाही. परंतु, याबाबत शेवटच्या क्षणी जानकर यांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल. आपल्याशी अद्याप कोणत्याही पक्षाने संपर्क साधलेला नाही, असे आ. रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार रत्नाकर गुट्टे बुधवारी सायंकाळी मुंबईला रवाना झाले.