लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर व शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांनी शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी १८ उमेदवारांचे २२ अर्ज दाखल झाले आहेत. अखेरच्या दिवसापर्यंत २७ उमेदवारांनी ३६ अर्ज दाखल केले आहेत.परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होत असून १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. यासाठी १९ ते २६ मार्च दरम्यान इच्छुकांना अर्ज दाखल करण्याचा कालावधी दिला होता. त्यानुसार २५ मार्चपर्यंत १० उमेदवारांचे १३ अर्ज दाखल झाले होते. २६ मार्च हा उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अपेक्षेप्रमाणे मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांनी २ अर्ज दाखल केले. तर शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांनी ३ नामनिर्देशनपत्र दाखल केले. याशिवाय स्वतंत्र भारत पक्षातर्फे डॉ.अप्पासाहेब ओंकार कदम, बहुजन समाज पार्टीतर्फे डॉ.वैजनाथ सीताराम फड, प्रा.डॉ. शामसुंदर पंढरीनाथ वाघमारे यांनी अर्ज दाखल केले. संघर्ष सेनेतर्फे हरिश्चंद्र दत्तू पाटील, भारतीय बहुजन क्रांती दलातर्फे संतोष गोविंद राठोड, बहुजन आझाद पार्टी व अपक्ष असे २ अर्ज सखाराम बोबडे यांनी दाखल केले. भारिप बहुजन महासंघातर्फे अशोक गणपतराव पंडित यांनी तर बहुजन मुक्ती पार्टीतर्फे उत्तमराव पांडुरंगराव राठोड यांनी अर्ज दाखल केले. वंचित बहुजन आघाडीकडून डॉ.धर्मराज ज्ञानोबा चव्हाण यांनी अर्ज दाखल केला. किशोर नामदेव गवारे यांनी भारतीय प्रज्ञा सुराज्य पक्षातर्फे तर सुभाष अशोक अंभोरे यांनी आंबेडकर नॅशनल पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले. याशिवाय बालासाहेब शेषराव हारकळ, उद्धव रामभाऊ पवार, राजेंद्र दामोदर पगारे, सिद्धेश्वर पंडितराव पवार, संजय रामराव परळीकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. अखेरच्या दिवशी १८ उमेदवारांचे २२ अर्ज दाखल झाले तर १९ ते २६ मार्च या कालावधीत एकूण २७ उमेदवारांचे ३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २७ मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून २९ मार्च रोजी दुपारी ३ पर्यंत उमेदवारी परत घेता येणार आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांची निश्चिती होणार असून त्याच वेळी उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे.रॅलीद्वारे संजय जाधव यांची उमेदवारी दाखल४परभणी- परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार खा.बंडू जाधव यांनी मंगळवारी शहरातून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. शनिवार बाजार येथून निघालेल्या रॅलीत जिल्हाभरातून शिवसैनिक, भाजप व सहकारी पक्षांचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने दाखल झाले होते. शहरातील शनिवार बाजार परिसरातून ही रॅली निघणार असल्याने सकाळी १० वाजेपासूनच या ठिकाणी कार्यकर्ते जमा होत होते. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून वाहनांच्या सहाय्याने कार्यकर्ते शनिवार बाजार भागात एकत्र आले. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र काही कारणांमुळे आदित्य ठाकरे परभणीत दाखल झाले नाहीत. त्यानंतर स्थानिक नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी रॅलीला प्रारंभ झाला. ढोल-ताशाचा गजर करीत ही रॅली निघाली. यावेळी खा.बंडू जाधव, राज्यमंत्री अर्जून खोतकर, आ.डॉ.राहुल पाटील, आ.बिप्लव बाजोरिया, आ. मोहन फड, माजी आ.विजय गव्हाणे, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, ए.जे. बोराडे, सुरेश ढगे, गंगाप्रसाद आणेराव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, राहुल लोणीकर, माजी आ.मीराताई रेंगे, मेघना बोर्डीकर यांंच्यासह जिल्हाभरातील शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. सजविलेल्या गाडीतून मान्यवर या रॅलीत सहभागी झाले. नानलपेठ, शिवाजीचौक, गांधी पार्क, नारायणचाळ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ही रॅली दाखल झाली. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खा.बंडू जाधव यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.मित्र पक्षांसह अनेक नेते राजेश विटेकरांच्या रॅलीत४परभणी- कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांनीही मंगळवारी शक्तीप्रदर्शन करीत शहरातून रॅली काढली. या रॅलीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आघाडीच्या रॅलीसाठी दुपारी १ ते ३ चा वेळ देण्यात आला होता. ही रॅली जिंतूररोडवरील नूतन महाविद्यालयाच्या परिसरातून निघाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हाभरातून रॅलीसाठी परभणीत दाखल झाले. दुपारी १२ वाजेपासूनच नूतन महाविद्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी झाली. त्यानंतर दुपारी साधारणत: २ वाजेच्या सुमारास ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गांवरुन मार्गस्थ झाली. आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यासह आ.विजय भांबळे, माजीमंत्री सुरेश वरपूडकर, माजी आ.सुरेश देशमुख, माजी आ.सुरेश जेथलिया, स्वराजसिंह परिहार, रविराज देशमुख, अशोक काकडे, दादासाहेब टेंगसे, दशरथ सूर्यवंशी, माजी महापौर प्रताप देशमुख, बाळासाहेब जामकर, अजय चौधरी आदींसह कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी, लोक प्रतिनिधी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायणचाळ आदी भागात रॅलीचे स्वागत करण्यात आले. ही रॅली शासकीय रुग्णालय, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर राजेश विटेकर यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यानंतर रॅली जिल्हा क्रीडासंकुलात दाखल झाली. येथे रॅलीचे सभेत रुपांतर झाले. रॅलीमध्ये कार्यकर्त्यांसह नेत्यांची उपस्थिती दिसून आली.
परभणी शहरातून काढली रॅली : कार्यकर्त्यांच्या गर्दीने रस्ते फुलले; शक्तीप्रदर्शनासह युती-आघाडीचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:17 AM