गंगाखेड : शहरातील एका सराफा व्यापाऱ्याच्या घरासमोर चिठ्ठ्या टाकून २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मोठ्या कौशल्याने गजाआड केले आहे. सराफा व्यापाऱ्याच्या घरासमोर अस्पष्ट असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून आरोपीच्या चालण्याच्या व वागण्याच्या लकबीवरून आणि संशयावरून हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.
४ सप्टेंबर रोजीची शहरातील ही घटना येथील महेंद्र बालाजी टाक यांच्या घरासमोर ४ सप्टेंबर रोजी एक चिठ्ठी टाकून २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. तसेच चिठ्ठीमध्ये पैसे कुठे द्यायचे, त्याचाही उल्लेख करण्यात आला. ही बाब पोलिसांना सांगितली तर पत्नी, दोन मुलांना जीवे मारण्याची धमकीही या चिठ्ठीत दिली होती. त्यामुळे महेंद्र टाक हे घाबरले. संपूर्ण कुटुंबीयच भीतीच्या सावटाखाली होते. मात्र तरीही या प्रकाराकडे दुर्लक्ष करून टाक यांनी त्यांच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावला. त्यानंतर पुढे ११ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास परत एकदा अशा प्रकारची चिठ्ठी घरासमोर टाकण्यात आली. यावेळी मात्र १५ लाख रुपयांची खंडणीची मागणी करुन पैसे देण्याची जागा बदलण्यात आली. या प्रकारानंतर मात्र टाक कुटुंबीय चांगलेच घाबरले. सराफा असोसिएशनच्या माध्यमातून पोलिसांना घटनाक्रम सांगण्यात आला. पोलीसही वेगवेगळ्या कसोट्यांवर तपास करण्याचा प्रयत्न करीत होते. या प्रकरणात ११ सप्टेंबर रोजी रितसर तक्रार देण्यात आली.
गंगाखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जी. टी. बाचेवार यांनी तपासाची सुत्रे हाती घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यात आरोपी अस्पष्ट दिसत होता. त्याचा चेहरा खाली असल्याने स्पष्टपणे समोर आला नाही. बाचेवार यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील आरोपीच्या हालचाली तसेच लकबीचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यानंतर फोटोग्राफरच्या मदतीने सीसीटीव्हीत दिसणाऱ्या आरोपीची उंची, त्याची देहयष्ठी, त्याचे केस आदींचे वेगवेगळे चित्र तयार करून आरोपीचे कल्पना चित्र बनविण्यात आले. आरोपीचे शरीर पिळदार असल्याने शहरातील व्यायाम शाळांमध्येही तपासणी करण्यात आली. तसेच ज्या ठिकाणी रक्कम आणण्यास सांगितली होती. त्या ठिकाणी जावून अनेकांची पाहणी केली. त्यात सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या आरोपीसारखे व्यक्तिमत्व समोरून येताना दिसले. संशयावरून त्याला ताब्यात घेतले आणि संशय खरा ठरला. तोच आरोपी निघाला व त्याने सर्व कबुली दिली.
कल्पकतेने उघडकीस आणला गुन्हा
खंडणीच्या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक बाचेवार यांनी अतिशय कल्पकतेने हे प्रकरण हाताळले. ताब्यात घेतलेल्या संशयित युवक सुरुवातीला घाबरलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे संशय अधिकच वाढला. त्याला धीर देत दोन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर संशयिताला सीसीटीव्ही दाखवत त्याच पद्धतीने चिठ्ठी टाकण्याचे सांगण्यात आले. अन् येथेच आरोपीला आपण पकडले गेल्याचे कळून चुकले. आरोपीने सय्यद समील सय्यद समीर ऊर्फ बाबा (२३ रा. दस्तगीर मोहल्ला) असे त्याचे नाव सांगितले. तसेच घरासमोर खंडणीची चिठ्ठीही टाकल्याची कबुली दिली. त्यामुळे मागील २० दिवसांपासून टाक कुटुंबीयांचा जीव भांडण्यात पडला.
इतरांचीही केली जातेय चौकशी
या धमकी प्रकरणात पकडलेला आरोपी सय्यद समी सय्यद अमीर ऊर्फ बाबा याच्यासोबत आणखी इतर कोणी आरोपी आहेत का? याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. मुख्य आरोपी गळाला लागल्याने गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यांची चिंता दूर झाली आहे. तांत्रिक बाबींचा वापर करीत पोलिसांनी हे प्रकरण हाताळत आरोपीला ताब्यात घेतले.