दोन वर्षांपूर्वी तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळात तालुक्यातील शेतकरी भरडला गेला होता. दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेले ६८०० रुपये दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना वाटप करावे यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना आजपर्यंत दुष्काळी अनुदान मिळाले नाही. त्यामुळे दुष्काळी अनुदानाचे वाटप करावे तसेच यावर्षीच्या ऑगस्ट ते ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या यादीत तालुक्यातील डोंगरी भागाचा समावेश करून हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान द्यावे, विद्युत विभागाने सुरू केलेली नियमबाह्य लोडशेडिंग बंद करून शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा करावा, डोंगर भागातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर वर्ग न करता राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर जमा करावी आदी विविध मागण्यांसाठी डोंगरी विकास जन आंदोलनाच्यावतीने सोमवारी रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात पंडित घरजाळे, दशरथ मोटे, प्रदीप मुंडे, सीताराम देवकते, नागनाथ गरड, गुलाब शिसोदे, पंडित सोडगीर, पदमाकर मरगीळ, आश्रोबा सोडगीर, अशोक मुंडे, बालाजी मुंडे, साहेबराव पंडित, बळीराम सोडगीर, सर्जेराव सोन्नर, हनुमान परकड, योगेश फड, सायसराव खांडेकर, बळीराम मुंडे, ज्ञानोबा फड, शिवाजी शिसोदे आदींसह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.आंदोलनानंतर पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
दुष्काळी अनुदानासाठी रस्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:13 AM