गंगाखेड (परभणी ) : तालुक्यातील मुळी येथे गोदावरी नदी पात्रात असलेल्या बंधाऱ्याला उभ्या उचल पध्द्तीचे दरवाजे बसवावे, दुष्काळी उपाय योजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि.१० ) सकाळी ११ वाजता दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीने रस्तारोको करण्यात आला. खळी गोदावरी पुलाजवळ झालेल्या या आंदोलनाने गंगाखेड-परभणी मार्ग सुमारे अडीच तास बंद होता. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागून वाहतुक ठप्प झाली होती.
अत्यल्प प्रजन्यमान झाल्याने तालुक्यात भीषण पाणी टंचाईबरोबरच भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या भागातील शेतकरी, शेतमजुर, कामगार व व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडून हतबल झाला आहे. शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरणाऱ्या मुळी बंधाऱ्याला दरवाजे नसल्याने गोदावरी नदी काठच्या गावांना ही कधी नव्हे अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पाऊसाळ्यापुर्वी मुळी बंधाऱ्याला उभ्या उचल पध्दतीचे दरवाजे बसवावे, दुष्काळी उपाय योजनांची अंमलबजावणी करावी, जनावरांसाठी चारा छावणी उभारावी, कष्टकऱ्यांचे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवावी आदी विविध मागण्यांकरीता खळी पुलाजवळ शुक्रवार रस्तारोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित नायब तहसिलदार ज्ञानेश्वर घोंगडे, मंडळ अधिकारी शंकरराव राठोड यांनी आंदोलकांकडुन मागण्यांचे निवेदन स्विकारले.
आंदोलनात कॉ. राजन क्षीरसागर, लक्ष्मणराव गोळेगावकर, ओमकार पवार, माजी खा. अॅड सुरेश जाधव, शंकरराव मोरे, माणिकराव कदम, संजय कच्छवे, शिवाजीराव कदम, सुरेश ईखे, आनिल मोरे, भगवान शिंदे, शिवाजी जाधव, गोपीनाथ भोसले, माणीकराव पवार, रमेशराव पवार, विशाल मोरे, उत्तम पवार, सुवर्णमाला मोतीपवळे, गोविंदराव मानवतकर, विजय सोन्नर, चंद्रकांत जाधव, लहु सलगर, गंगाधर जाधव, राजेभाऊ कदम, साहेबराव भोसले, दादासाहेब पवार, अशोकराव भोसले, रामेश्वर पवार, गजानन लाडे, दत्ता पवार, बळीराम सोन्नर आदींची उपस्थिती होती.