परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे प्रमाण केवळ १०.८८ टक्के एवढीच आहे. त्यामुळे तपासण्यांची संख्याही मर्यादितच असल्याची बाब आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. या काळात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या हाय रिस्क संपर्कातील नागरिक आणि लो रिस्क संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला देण्यात आले होते.जेणे करून बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये हा उद्देश समोर ठेवण्यात आला. मात्र जिल्ह्यामध्ये हे प्रमाण कमी असल्याची बाब प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ७२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांच्या हाय रिस्क संपर्कातील ३७ हजार ९९७ आणि लो रिस्क संपर्कातील २८ हजार ७६ अशा एकूण ६६ हजार ७३ नागरिकांच्या तपासण्या प्रशासनाने केल्या आहेत. हे प्रमाण केवळ १०.८८ टक्के एवढे आहे.
जिल्ह्याच्या तुलनेत ग्रामीण भागात मात्र हे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात ३ हजार २८० बाधित रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांच्या हाय रिस्क संपर्कातील २२ हजार ९९८ आणि लो रिस्क संपर्कातील १८ हजार ३२५ अशा एकूण ४१ हजार ३२३ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. हे प्रमाण १२.६० एवढे आहे. एकंदर बाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन तपासणीचे प्रमाण ११ आणि १२ टक्क्यांच्या आसपास असल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये जिल्ह्यात कमी कामगिरी झाल्याची बाब आकडेवारीवरून स्पष्ट झाली.
दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला आहे. या आकडेवारीवरून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या परभणी शहर आणि तालुक्यात अधिक आहे. मात्र असे असताना या तालुक्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण कमी राहिले. महानगरपालिलकेच्या हद्दीत २ हजार ७९२ बाधित रुग्ण आढळले. या रुग्णांच्या हाय रिस्क संपर्कातील १४ हजार ९९९ आणि लो रिस्क संपर्कातील ९ हजार ७५१ अशा २४ हजार ७५० नागरिकांची तपासणी करण्यात आली. हे प्रमाण ८.८६ टक्के एवढे आहे.
ग्रामीण भागात ३१४ रुग्ण आढळले असून, या रुग्णांच्या संपर्कातील १ हजार ५८२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. हे प्रमाण ५.०४ टक्के आहे. ग्रामीण भागातही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कमीच आहे. जिल्ह्यात मानवत शहरात मात्र सर्वात कमी काम झाले आहे. मानवत शहरात २०८ रुग्ण आढळले. या रुग्णांच्या संपर्कातील केवळ ७०४ नागरिकांच्याच तपासण्या झाल्या आहेत. हे प्रमाण ३.५६ टक्के एवढे आहे. या तालुक्यात ग्रामीण भागात हे प्रमाण १६.४६ एवढे अधिक आहे.