लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोमवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवार सुटीचा दिवस असतानाही शहरातील बाजारपेठेत गजबज पहायला मिळाली़ गणरायाच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले असून, जिल्ह्यात तयारीला सुरुवात झाली आहे़यावर्षी पावसाळी हंगामात पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, गणरायांच्या आगमनाबरोबरच या पावसाने उत्साह संचारला आहे़ सोमवारी ठिक ठिकाणी श्री गणरायाची स्थापना केली जात आहे़ या पार्श्वभूमीवर परभणी शहरात सकाळपासूनच लगबग सुरू झाली़ येथील गांधी पार्क, गुजरी बाजार, क्रांती चौक या भागात अनेक लघु व्यावसायिकांनी दुकाने थाटून गणेशोत्सवासाठी साहित्य उपलब्ध केले आहे़या बाजारपेठेत रविवारीच गणेश भक्तांनी खरेदीसाठी गर्दी केली होती़ सकाळपासूनच बाजारपेठेतील उलाढाल वाढली़ गणरायांच्या स्थापनेबरोबरच सजावटीच्या साहित्यांनाही ग्राहकांची मागणी दिसून आली़ त्याचप्रमाणे पूजेसाठी लागणारे फुले, आघाडा, दुर्वा, हळद, कुंकू, गुलाल, हार, तोरणही हे साहित्यही विक्रीसाठी दाखल झाले आहे़ प्रसादाचे साहित्य, सजावटीमध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे़ रविवारीच अनेकांनी खरेदी आटोपून घेतली आहे़ सोमवारी सकाळी श्री गणरायाची स्थापना करावयाची असल्याने आदल्या दिवशी अनेकांनी पूर्व तयारी करून घेतली आहे़ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ फुलली असून, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे़ एकंदर रविवारी दिवसभर परभणी शहरात गणेशत्सवाची लगबग सुरू होती.गणेश मूर्तीच्या किंमती वधारल्या४यावर्षी निर्माण झालेली मंदीची परिस्थिती आणि वाढत्या महागाईचा परिणाम गणेशमूर्तींच्या किंमतीवर झाला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत १० टक्के किंमती वाढल्या आहेत़ येथील बाजारपेठेत गणेश मूर्तींची विक्री करणारे स्टॉल्स लागले असून, अर्ध्या फुटापासून ते १५ फुट उंचीच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत़४१०० रुपयांपासून ते ३० हजार रुपयांपर्यंत गणेश मूर्तीचे दर आहेत़ रविवारी अनेक गणेश भक्तांनी गणेश मूर्तींची खरेदी केली़ सोमवारी सकाळपासून या बाजारपेठेत गर्दी वाढणार आहे़मंच उभारणीचे काम पूर्ण४शहरातील विविध भागांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी मागील आठ दिवसांपासून मंच उभारणीचे काम सुरू केले होते़ रविवारी या कामाला अंतीम स्वरुप देण्यात आले़४गांधी पार्क, सरकारी दवाखाना, जिंतूर रोड, वसमत रोड, देशमुख हॉटेल परिसरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणरायाच्या स्थापनेसाठी मंच उभारले आहेत़ हे काम रविवारी उशिरापर्यंत पूर्ण करण्यात आले़
परभणीत बाजारपेठ सज्ज :बाप्पांच्या स्वागताची शहरात जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 11:18 PM