मास्कचा विसर
सोनपेठ- शहरात नागरिक चेहऱ्यावर मास्क न लावताच फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या प्रसारामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना कोरोनाचा विसर पडला की काय असेही दिसून येत आहे.
धूर फवारणीची आवश्यकता
देवगाव फाटा- सेलू शहर व तालुक्यात सध्या डासांचे प्रमाण वाढले आहे. थंडी तापेच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे शहरात नगरपालिकेने तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने धूर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त
देवगाव फाटा- सेलू तालुक्यात चार - पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून सूर्यदर्शन होत नसल्याने तापमानात मोठी घट झाल्याने थंडी वाढत आहे. वातावरणातील बदलांमुळे रब्बी पिकांना धोका वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
वाहनांचा रस्त्यावर मुक्काम
देवगाव फाटा - सेलू शहरात कापसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इतर जिल्ह्यांतील कापूस विक्रीसाठी चारचाकी वाहने शहरातील जिनिंग रस्त्यावर उभी आहेत. साहजिकच मोठ्या प्रमाणात आलेल्या वाहनांतील कापसाचे माप घेण्यास वेळ लागत असल्याने वाहनांचा कित्येक तास रस्त्यावर मुक्काम होत आहे.
मोकळी मैदाने बनताहेत नशेखोरांचे अड्डे
देवगाव फाटा - शहरातील मोकळ्या मैदानावर रात्री मद्यपींचा वावर वाढला असून ही मैदाने नशेबाजांचे अड्डे बनत आहेत. विशेषतः खेळाच्या मैदानात दारूच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास व स्नँस्कची रिकामी पाकिटे सर्वत्र पडलेली दिसून येत आहेत.