जिंतूर (परभणी ) : घनसावंगीहून वर्ध्यापर्यंत महसूल प्रशासनाची रॉयल्टी फाडून वर्ध्याऐवजी जिंतूर शहरात वाळू टाकून लाखो रुपयांचा गोरख धंदा करणाऱ्या वाळू वाहतूक वाहनांवर महसूल विभागाने नुकतीच दंडात्मक कार्यवाही केली आहे़
२ मार्च रोजी मंडळ अधिकारी विजय बोधने व तलाठी सुभाष होळ यांनी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एमएच २०, डी़टी़ २१२२ वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला़ संबंधित चालकाची विचारपूस केल्यानंतर त्याने ही वाळू वर्धा येथे टाकत असल्याचे सांगितले़ महसूल कर्मचाऱ्यांनी संबंधित ट्रक तहसील कार्यालयात लावण्याची सूचना ट्रक चालकाला केल्यानंतर संबंधिताने तहसील कार्यालयाच्या गेटसमोर वाळुचा ट्रक लावून पोबारा केला़ हा ट्रक घनसावंगी येथील रामदास आरदाड यांचा असून, घनसावंगी ते वर्धा अशा ४५० किमीची रॉयल्टी भरून ४८ तासांच्या कालावधीत जिंतूर येथे दोन ते तीन वाळूची खेपा केल्या जातात़ दररोज अशा बेकायदेशीरपद्धतीने वाळू शहरता येत असल्याने महसूल प्रशासन हतबल झाले होते़ २ मार्च रोजी वाळू चोरट्याला पकडल्यानंतर शहरात चोरट्या मार्गाने वाळू कशी येते याबाबत उलगडा झाला़