शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था
येलदरी: जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील ५५ वर्षांपूर्वी बांधलेल्या विश्रामगृहाची प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरवस्था झाली आहे. हे विश्रामगृह वापराविना पडून राहिल्याने इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे अर्धशतकाचा वारसदार अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व तालुका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन विश्रामगृह पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
जिल्हा रुग्णालयात वाढली अस्वच्छता
परभणी: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाॅर्ड व परिसरात अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणी स्वच्छता पाळली जात आहे. मात्र येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाॅर्ड व परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे. स्वच्छतेची कामे करण्यासाठी जवळपास २० कर्मचाऱ्यांची कंत्राटी स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे.
परभणी बसस्थानकात चोऱ्या वाढल्या
परभणी: येथील बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्याअभावी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी चोरट्यांनी एका प्रवाशास लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर छोट्या-मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे पोलीस व महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय महामार्गाची चाळणी
सोनपेठ: नव्याने घोषित करण्यात आलेल्या मेहकर- मंठा- पाथरी- सोनपेठ या राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील विटा ते गवळी पिंपरी या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.