लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच १७ मार्च रोजी जिल्ह्यात २३५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्याचप्रमाणे एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्हावासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे. त्यातच ३ दिवसांपासून नव्या रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली. बुधवारी आरोग्य विभागाला १ हजार ९७ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या ६०१ अहवालांमध्ये १११ तर रॅपिड टेस्टच्या ४९६ अहवालांमध्ये १२४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या परजिल्ह्यातील एका पुरुषाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ९ हजार ७७१ रुग्ण असून, ८ हजार ८०८ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३४७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ६१६ रुग्ण उपचार घेत आहेत.
शहरातील आयटीआय रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १०७वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे १४१ रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर गृह अलगीकरणातील ३६८ रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत.