असोला पाटी ते झीरो फाटा रस्त्याची दुरवस्था
परभणी : वसमत रस्त्यावरील असोला पाटी ते झीरो फाटा या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्गांतर्गत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून, त्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे येथील मार्गावर वाहनधारकांना कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. परिणामी, अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
शासकीय कार्यालयात नियमांचा बोजवारा
परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरातील शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचा बोजवारा उडत आहे. दररोज कामानिमित्त येणाऱ्या शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. मात्र, फिजिकल डिस्टन्स राखण्याच्या संदर्भात प्रशासकीय उदासीनता दिसून येत आहे.
शहरातील सार्वजनिक हातपंप दुरुस्त करा
परभणी : शहरातील सर्व प्रभागातील सार्वजनिक हातपंपांची दुरवस्था झाली असून, अनेक हातपंप बंद आहेत. शहरवासीयांना उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. या काळात पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी मनपाने आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या अंतर्गत वसाहतींमधील हातपंपाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
मोकळ्या मैदानातील अतिक्रमण हटवा
परभणी : शहरातील खेळाच्या मोकळ्या मैदानावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी मैदाने शिल्लक राहिले नाहीत. महानगरपालिकेने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईची मागणी
परभणी : शहरातील बाजारपेठेसहअंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचे नियम मोडत अनेक वाहनधारक विरुद्ध मार्गाने वाहतूक करीत आहेत. त्यामुळे वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. पोलीस प्रशासनाने याविरुद्ध कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
नालीवरील ढापा गायब
परभणी : येथील जिल्हा स्टेडियमसमोरील नालीवर टाकलेला ढापा गायब झाला आहे. त्यामुळे ही नाली वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. प्रवेशद्वारावरच खड्डा पडल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.