वस्सा (जि. परभणी) : जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील उमेश रंगनाथ कंठाळे या युवकाचा ९ मार्चला रात्री हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला होता. यानंतर त्याच्यावर मुंबईच्या केईएम हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना त्याचा बुधवारी (दि. १९) सकाळी मृत्यू झाला. या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असतानादेखील त्यांनी उमेश याचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्वरित नेत्रदान सुद्धा पूर्ण झाले.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या वस्सा येथील उमेश कंठाळे यास ९ मार्चला रात्री तत्काळ नांदेडला उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु उमेश कंठाळे हे उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांना गंभीर अवस्थेत डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु तिथे त्याची प्रकृती जास्तच खालावली आणि बुधवारी सकाळी ६:३० वाजता उमेश यांचे निधन झाले. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अशा दु:खद प्रसंगी दु:खातून सावरत कंठाळे कुटुंबीयांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. लगेचच केईएम हॉस्पिटल मुंबईला मयत उमेश कंठाळे यांचे वैद्यकीय सोपस्कार पूर्ण करून नेत्रदान करण्यात आले.