लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्यात एस.टी.बसेसमध्ये आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परभणी येथील बसस्थानकात बसेसची पाहणी केली असता या बसेसमध्ये आग विझविण्यासाठी आवश्यक असलेले अग्निशमन यंत्र अडगळीत पडल्याचे दिसून येत आहे.
परभणी येथील बसस्थानकातून ६५ बसेस दररोज रस्त्यावरुन धावतात. या बसमधून जवळपास १० हजार प्रवासी दररोज ये-जा करतात. या प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी एस. टी. महामंडळावर असते. आगीची घटना घडली ती आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा प्रत्येक बसमध्ये असणे आवश्यक आहे. मात्र, परभणी येथील आगारामधून धावणाऱ्या काही बसमध्ये शुक्रवारी ही यंत्रणा दिसून आली नाही. तर काही बसेसमध्ये ४ व ६ किलोचे असणारे अग्निशमन यंत्र अडगळीत पडल्याचे दिसून आले.
या बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नाही !
१ - परभणी- औरंगाबाद
२ - परभणी-पुणे
३- परभणी- कोल्हापूर
४- परभणी- नागपूर
५- परभणी- कुंभारी
प्रथमोपचार पेट्याही गायब
परभणी येथील बसस्थानकात शुक्रवारी केलेल्या पाहणीत बहुतांश बसमध्ये प्रथमोपचार पेटी दिसून आली नाही. याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता प्रत्येक वाहकाजवळ या प्रथमोपचार पेट्या देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात काही वाहकांजवळ या पेट्या दिसून आल्या नाहीत.
वायफाय सुविधा नावालाच
प्रवाशांना प्रवास करताना मनोरंजन व्हावे, यासाठी वायफायची सुविधा एस.टी.महामंडळ प्रशासनाने बसमध्ये ठेवली होती. मात्र सद्यस्थितीत ही वायफाय सुविधा बंद पडली असून केवळ नावालाच उरली आहे. त्यामुळे प्रवाशांमधून महामंडळाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.
आगारात आओ जावो घर तुम्हारा
परभणी येथील एस. टी. आगाराची सुरक्षेची भिस्त केवळ एकाच सुरक्षारक्षकावर अवलंबून असल्याने आगाराच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची सुरक्षा धोक्यात आल्याची बाब शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. एस. टी. आगारास अचानक भेट देऊन केलेल्या पाहणीत ही बाब दिसून आली.
हा तर स्मोकिंग झोन
एस.टी.महामंडळाच्या वतीने अनेक ठिकाणी स्मोकिंग झोन तयार करण्यात आले. मात्र, प्रवाशांकडून स्मोकिंग झोनमध्येच सिगारेट, विडी ओढत होते. त्याचबरोबर गुटखा खाऊन अनेक ठिकाणी पिचकाऱ्या मारल्याचेही दिसून आले.
एस.टी.महामंडळ प्रशासनाकडून परभणी आगारातील ६५ बसेसमध्ये ४ व ६ किलोचे अग्निशमन यंत्र ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर अपघाताची घटना घडल्यास प्रवाशांना प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी प्रत्येक वाहकाकडे प्रथमोपचार पेटी ठेवण्यात आली आहे.
- दयानंद पाटील, आगारप्रमुख परभणी.
एसटीची आतून दुरवस्था
परभणी बसस्थानकातून ग्रामीण भागात धावणाऱ्या अनेक बसेसची आतून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.