परभणी : एकेकाळी गल्लीबोळात दिसणारे तेलाचे लाकडी घाणे बंद झाले होते. मात्र आता पुन्हा नागरिक घाण्याच्या तेलाकडे वळले असून, या तेलाला मागणी वाढली आहे.
जिल्ह्यात मध्यंतरी रिफाइंड आणि डबल रिफाइंड तेल खाण्याचे प्रस्थ वाढले होते. मात्र आता नागरिकांमध्ये बऱ्यापैकी जागृती झाली असून, संतुलित आणि सकस आहार घेण्यावर भर दिला जात आहे. त्यातूनच रिफाइंड केलेले तेल वापरण्यापेक्षा पौष्टिक मूल्य संतुलित प्रमाणात असलेले लाकडी घाण्याचे तेल वापरण्यावर नागरिकांनी भर दिला आहे. त्यातूनच या तेलाला जिल्ह्यात मागणी वाढली आहे.
रिफाइंड तेल घातक का?
n रिफाइंड तेलाच्या वापराने चरबी वाढते. त्यातच डबल रिफाइंड केलेल्या तेलातील आवश्यक असलेले गुणधर्म काढून टाकले जातात.
n त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले गुणधर्म फिजिकली रिफाइंड म्हणजेच घाण्याच्या तेलातून मिळतात.
हृदय रुग्णांकडून अधिक मागणी
हृदयाच्या समस्या असणाऱ्या रुग्णांना संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. अनावश्यक चरबी वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळेच घाण्याच्या तेलाचा वापर करण्यास पसंती दिली जात आहे.
लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय
लाकडी घाण्यातून काढलेल्या तेलात शरीरासाठी आवश्यक असलेले ओमॅगा ३ हे फॅटी ॲसिड मिळते. जे रिफाइंड तेलात मिळत नाही. त्यामुळे अनेकांनी लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय निवडला आहे. शहरात फलक लावून असे तेल विक्री होत आहे.
रिफाइंड केलेल्या तेलात ओमॅगा ६ हे फॅटी ॲसिड असते. या ॲसिडमुळे चरबी वाढते, तर दुसरीकडे घाण्याच्या तेलात नैसर्गिकरीत्या शरीराला आवश्यक असलेेले ओमॅगा ३ हे फॅटी ॲसिड मिळते. व्हिजिटेबल ऑइल, नट ऑइलही शरीरासाठी पोषक असते. त्यामुळे हे तेल आहारात वापरल्यास अनावश्यक चरबी वाढणार नाही.
- डॉ. रूपेश नगराळे, तज्ज्ञ