परभणी : जिल्ह्यात दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीच्या उपलब्ध जागा अधिक असल्याने जवळपास ७ ते ८ हजार जागा यावर्षी रिक्त राहण्याची शक्यता आहे.
दहावीचा निकाल १६ जुलै रोजी लागला. त्यानंतर आता कुठे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू केली आहे. जिल्ह्यात यावर्षी २८ हजार ४२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या तुलनेत जिल्ह्यात अकरावीच्या एकूण ३७ हजार १२० जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक उत्तीर्ण विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला तरी ८ हजार ६९७ जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थी मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. विशेषत: ग्रामीण भागात हा प्रश्न उपस्थित राहणार आहे.
मोठ्या महाविद्यालयांत गुणवत्ता यादी लागणार
जिल्ह्यात ११ वीच्या एकूण जागा जास्त व दहावीची विद्यार्थी संख्या कमी अशी स्थिती असली तरी मोठ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मात्र प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी लागणार आहे. विज्ञान व वाणिज्य शाखेची ही स्थिती आहे. कला शाखेत थेट प्रवेश मिळत आहेत.
प्राचार्य म्हणतात...
यावर्षी पहिल्यांदाच १० वीचा निकाल १०० टक्के लागल्याने प्रवेश अर्ज जास्त व ११ वीमधील जागा कमी असे समीकरण असणार आहे. यासाठी महाविद्यालयाला प्रवेश मागणीनुसार तात्पुरत्या स्वरूपात क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश घेण्यासाठी तुकडीवाढ मंजूर करणे गरजेचे आहे.
- डॉ. शरद कुलकर्णी, सेलू
११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गुणवत्तेचा निकष लावला जाणार आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश झाला असे समजू नये. मागणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी शासनाने सुधारित धोरण लागू करावे.
- रमेश नखाते, वालूर