परभणी : महापालिकेंतर्गत आरटीपीसीआर तसेच अँटिजन चाचणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह प्रयोगशाळा तंत्रज्ञांना सेवेत नियमित करण्याची मागणी प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी २ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना निवदेन सादर करण्यात आले. मागील एक वर्षापासून कोरोनाच्या काळात महापालिकेंतर्गत शहरामध्ये आरटीपीसीआर आणि रॅपिड चाचणी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी नेमण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना व प्रयोगशाळा तंत्रज्ञांना कामावरून कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता हा निर्णय घेतल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन सेवा पूर्ववत करावी व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
निवेदनावर नितीन जोगदंड, शेख जुनेद, संतोष खोंडे, शरद जाधव, भागवत शिंदे, संध्या उबाळे, स्नेहल पाटील, मनीषा सावणे, कोमल मानवते, शारदा वरकड, विष्णू काळे, दीपाली मगर, वैभव डुबे, गणेश लोंढे, गजानन पुरी, सय्यद सोबेर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.