पिंगळी (जि. परभणी) : परभणी तालुक्यातील पाथरा येथील शेतकरी सय्यद समंदर सय्यद छोटू यांनी पारंपरिक पिकात बदल करून सव्वा एकरात कांद्याचे पीक घेऊन सुमारे साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने कांद्याची लागवड, पाण्याचे व्यवस्थापन यातून सय्यद समंदर यांनी हे उत्पन्न काढले आहे.
शेतीमध्ये प्रयोग केल्यास निश्चित त्यात फायदा होतो. पारंपरिक पिकांबरोबरच काही प्रमाणात प्रयोगात्मक पीक घेतले तर उत्पन्न वाढू शकते, हे सय्यद समंदर यांनी दाखवून दिले आहे. मागील तीन वर्षांपासून त्यांनी कांदा उत्पादनाला सुरुवात केली. यावर्षी जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जमिनीची पाणीपातळीही वाढलेली आहे. त्याचा फायदा घेत सय्यद समंदर यांनी त्यांच्या सव्वा एकर शेतजमिनीत कांद्याचे पीक घेतले. पुणे फुरसंगी पंचगंगा या वाणाचा वापर करीत त्यांनी कांद्याची लागवड केली.
विशेष म्हणजे, तुषार सिंचनावर कांदा लागवड करण्यात आली. त्यामुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. शेतात कूपनलिका आणि विहीर असल्याने पाण्याचे नियोजन करणे शक्य झाले. चार महिन्यांमध्ये १४० क्विंटल कांद्याचे उत्पादन घेण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे ८० ते १०० क्विंटलपर्यंत कांद्याचे उत्पादन होते. मात्र योग्य नियोजन केल्यामुळे हेच उत्पादन १४० क्विंलटपर्यंत वाढविण्यात आले आहे. इतर पिकांमध्ये एवढे उत्पन्न मिळत नाही. मात्र पीक पद्धतीत बदल करून सय्यद समंदर यांनी कांद्याचे उत्पादन घेऊन तेवढ्याच शेतजमिनीत साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे सय्यद समंदर यांनी कांदा उत्पादनातून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
सेलूच्या बाजारात कांद्याची विक्रीपाथरा येथील सय्यद समंदर यांनी उत्पादित केलेला कांदा सेलू येथील बाजारपेठेत विक्री केला आहे. २६ रुपये किलो असा दर मिळाला असून, त्यातून साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. पिकावर केलेला खर्च वजा जाता या पिकातून चांगले उत्पन्न मिळाले आहे, असे सय्यद समंदर यांनी सांगितले.