जायकवाडी धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे ; परंतु पैठण डावा कालवा नादुरूस्त असल्याने हे पाणी पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. कारण पैठण कालव्यामध्ये १२२ ते २०८ व शाखा कालवा ७० व इतर शाखा कालव्यामध्ये बऱ्याच प्रमाणावर गाळ साचलेला असल्यामुळे पूर्ण क्षमतेने सोडलेले पाणी देखील गाळामुळे कालव्यातून व्यवस्थित पुढे जात नाही. त्याचबरोबर संबंधित कालव्यावर अनेक गेट नादुरुस्त आहेत. त्यामुळे देखील पाणी योग्य पद्धतीने वितरित न होणे व पाणी वाया जाणे अशा घटना घडत आहेत. त्यासाठी पैठण डाव्या कालव्याच्या गेटची तत्काळ दुरुस्ती जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या नांदेड येथील यांत्रिकी मंडळांच्या वतीने करण्यात यावी. या विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ, मशीन उपलब्ध आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधणे यांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली होती. त्यानंतर कडू यांनी याबाबत जलसंपदा विभागाच्या सचिवांना बोलावून या कालव्याच्या दुरूस्तीचे काम नांदेड येथील यांत्रिकी मंडळामार्फत करा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष दुरूस्ती कामास सुरूवात कधी होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पैठण डावा कालवा दुरुस्तीचे काम यांत्रिकी मंडळामार्फत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:13 AM