पाथरी (परभणी) : कृषी जोडणी दिलेल्या रोहित्रचे ७० हजार रुपये बिल भरणा भरूनही शेतात लोंबकळत असलेल्या तारा दुरुस्ती करून दिल्या जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. वारंवार संपर्क करूनही मागणी पूर्ण होत नाही, तसेच सहायक अभियंता भेट नसल्याने एका संतप्त शेतकऱ्याने थेट ३३ केव्ही विद्युत केंद्रात प्रवेश केला. प्रसंगावधान राखून इतर शेतकऱ्यांनी त्याला बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना ७ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असल्याची माहिती असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील एका शेतकऱ्याच्या शेतातून ११ केव्ही उच्चदाबाच्या वाहिन्या गेल्या आहेत. शेतात काही ठिकाणी डोक्याला लागतील अशा अवस्थेत या तारा खाली लोंबकळत आहेत. यामुळे त्याभागातील शेत कसता येत नाही. महावितरणचे सहायक अभियंता एस. आर. शेम्बळे यांच्याकडे शेतकऱ्यांने अनेक वेळा तारा दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, दुरुस्ती झाली.
दरम्यान, ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सदर शेतकरी आणि ग्रामस्थांनी दुरुस्तीची मागणी करण्यासाठी महावितरणचे कार्यालय गाठले. त्यावेळी सहायक अभियंता यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कार्यालयात उपलब्ध नव्हते. त्यांना संपर्क केला असताही ते कार्यालात आले नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्याने अंगावरील कपडे काढून कार्यालया शेजारील ३३ केव्ही केंद्रात प्रवेश करत पोलवर चढण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी शेतकऱ्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला.
मी कार्यालयात नसताना काही शेतकरी आले होते. त्यांनी गोंधळ घातला अशी माहिती आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यात येतील.एस आर शेंबाळे, सहायक अभियंता विज वितरण पाथरी