परभणी : जिल्ह्यातील पाच हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती, नुतणीकरणासाठी राज्य शासनाने ३५ लाख ७८ हजार ७१० रुपयांच्या अनुदान वितरणास मंजुरी दिली आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढा, हैदराबाद मुक्तीसंग्राम, गोवा मुक्ती आंदोलनामध्ये भाग घेऊन ज्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले, अशा व्यक्तींच्या स्मरणार्थ शासनाच्या वतीने हुतात्मा स्मारके उभारण्यात आली आहेत. या हुतात्मा स्मारकांचे बांधकाम होऊन जवळपास ३५ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे अनेक हुतात्मा स्मारकांची दुरावस्था झाली आहे. भिंतीला तडे जाणे, पत्रे निखळणे, फरशी उखडणे परिसरात अस्वच्छता निर्माण होणे यामुळे दुरावस्थेत भर पडली आहे. या हुतात्मा स्मारकांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत होती. त्यामुळे २०१५-१६ मध्ये राज्यभरातील २०६ हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचे नियतव्यय उपलब्ध करुन देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. यासाठीचा २५ कोटी रुपयांचा निधी २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये मंजूर झाला आहे. यातील परभणी जिल्ह्यातील पाच हुतात्मा स्मारकांसाठी ३५ लाख ७८ हजार ७१० रुपयांच्या अनुदान वितरणास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, चारठाणा, पाथरी आदी हुतात्मा स्मारकांच्या नुतनीकरणाचे काम मार्गी लागणार आहे.
निधीतून होणार ही कामेजिल्ह्यासाठी मंजूर निधीमधून सर्व हुतात्मा स्मारकांच्या फरसबंदीकरीता पॉलिश कोटा वापरण्यात येणार असून आतमध्ये ग्रेनाईटची पट्टी बसविली जाणार आहे. तसेच प्रोजेक्टरसाठी व वातानुकूलीत यंत्रासाठी विद्युत व्यवस्था करावी लागणार आहे. शिवाय हुतात्मा स्मारकामध्ये अद्ययावत ग्रंथालय तयार करण्यात येणार आहे. शिवाय स्वयंपाक घर, बाथरुम अद्ययावत करुन स्लाईडींग विंडो लावण्यात येणार आहेत. स्मारकातील काही हॉल खाली-वर असल्याने ते एकत्र केले जाणार आहेत. शिवाय स्मारकावर पावडर कोटेड पत्रे बसविण्यात येणार आहेत. ज्या हुतात्मा स्मारकामध्ये सेफ्टीक टँक नाही, अशा हुतात्मा स्मारकात हा टँक बसविण्यात येणार आहे. तसेच सोलार पंप बसविले जाणार असून नवीन टाक्या बसविण्यात येणार आहेत.