गंगाखेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायती पैकी राणीसावरगाव, ईसाद, धारासुर, मरडसगाव, पिंपळदरी, सुप्पा, कोद्री, खळी, आरबुजवाडी, अंतरवेली, अकोली, आनंदवाडी, बडवणी, बोथी, बनपिंपळा, भेंडेवाडी, बोर्डा, चिंचटाकळी, डोंगरपिंपळा, डोंगरगाव, ढवळकेवाडी, ढेबेवाडी, देवकतवाडी, दामपुरी आदी ७० ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने या गावातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्यामुळे गंगाखेड शहरातील संत जनाबाई महाविद्यालयात ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या हितचिंतकांनी तोबा गर्दी केली होती. त्यामुळे संत जनाबाई महाविद्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप आल्याचे चित्र बुधवारी पहावयास मिळाले.
राणीसावरगाव, ईसाद, धारासुरकडे लक्ष
तालुक्यातील काही ग्रामपंचायती बिनविरोध निघण्याची शक्यता असून सर्वात मोठ्या असलेल्या तालुक्यातील राणीसावरगाव, ईसाद, धारासुर, मरडसगाव, पिंपळदरी, सुप्पा, कोद्री, खळी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथील लढती अत्यंत चुरशीच्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या निवडणुकीत ७० ग्रामपंचायतमधील सुमारे १००९८० मतदार मतदानाचा हक्क बजावून २२२ प्रभागातून ५९० सदस्य निवडून देणार आहेत.