परभणी : जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी जून २०१७ मध्ये बदली केलेल्यांपैकी काही कर्मचारी परस्परच संबंधित विभागप्रमुखांना हाताशी धरून जुन्या विभागात परतले आहेत़ त्यामुळे जि़प़चा ढिसाळ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे़
जिल्हा परिषदेत गेल्या १५ ते २० वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्यांच्या जून २०१७ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी विविध विभागांमध्ये व तालुकास्तरावर बदल्या केल्या होत्या़ बदली झालेले बहुतांश कर्मचारी खोडवेकर यांच्या कडक धोरणामुळे संबंधित ठिकाणी रूजू झाले होते़ परंतु, खोडवेकर यांची जशी बदली झाली, तसे कर्मचार्यांवरील प्रशासनाचे नियंत्रण सैल झाले़ त्यानंतर गेल्या दोन महिन्यांत बदली झालेल्यांपैकी अनेक कर्मचारी त्यांच्या जुन्या विभागात परस्पर परतू लागले आहेत़ यामध्ये अर्थ, बांधकाम, शिक्षण, लघु सिंचन या विभागातील कर्मचार्यांचा प्रामुख्याने समावेश आहे़ संबंधित विभागप्रमुखांना हाताशी धरून हे कर्मचारी रुजू झाले असले तरी वरिष्ठ अधिकार्यांनी मात्र या संदर्भात चुप्पी साधली आहे़
याबाबत जि़प़च्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी करडखेलकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अधिकृतरित्या कोणत्याही कर्मचार्याच्या सद्यस्थितीत बदल्या केल्या नसल्याचे सांगितले़ विभागप्रमुखांनी कामाची गरज म्हणून कोणाला बोलावून घेतले असेल तर ते माहीत नाही, असे ते म्हणाले़ बांधकाम विभागातील अभियंता श्रीमती मोतीपवळे या अनेक वर्षांपासून परभणीतच कार्यरत होत्या़ खोडवेकर यांनी त्यांची जिंतूरला बदली केली होती़ खोडवेकर यांचीच बदली झाल्यानंतर त्या पुन्हा बांधकाम विभागात परतल्या़ याबाबत या विभागाचे कार्यकारी अभियंता गोवंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कार्यालयात कामासाठी मोतीपवळे यांची गरज असल्याचे सांगून त्या येथे तात्पुरत्या स्वरुपात प्रतिनियुक्तीवर असल्याचे गोवंदे म्हणाले़ लघुसिंचन विभागातील अभियंता टने यांची जिंतूर येथे बदली करण्यात आली होती़ तेही पुन्हा विभागात परतले आहेत़ ही प्रातिनिधीक उदाहरणे असली तरी अनेक कर्मचारी वरिष्ठ अधिकार्यांना न जुमानता परस्परच विभागात परतल्याने जि.प.च्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अधिकार्यांशी समन्वय अन् पदाधिकार्यांचा वशिलाबदली झाल्यानंतर वर्षभराच्या आतच जे काही कर्मचारी परस्पर त्यांच्या विभागात परतले आहेत, त्यासाठी त्यांनी संबंधित विभागप्रमुखांशी समन्वय साधत त्यांची मर्जी संपादन केली़ तसेच काही पदाधिकार्यांचा वशिलाही त्यासाठी लावण्यात आला़ त्यामुळे गेल्या १५ ते २० वर्षांपासून ठाण मांडून कारभार करणार्या या कर्मचार्यांच्या खोडवेकर यांनी ज्या उद्देशाने बदल्या केल्या होत्या, तो उद्देश खोडवेकर यांच्या बदलीनंतर फोल ठरल्याचे दिसून येत आहे़