जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली
परभणी : जिल्ह्यात थंडी गायब झाली असून, हळूहळू उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. मागील दोन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. कमाल तापमान ३१.२ अंशावर पोहोचले, तर किमान तापमान १५.२ अंश नोंद झाले आहे. तापमान वाढीमुळे नागरिकांना आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दिवसा कडक ऊन आणि उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
ज्वारीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव
परभणी : जिल्ह्यातील काही भागांत ज्वारीच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास थायामिथोक्झाम १२.६ टक्के अधिक लॅमडा, सायहालोथ्रीन ९.५ झेडसी ५ मिली किंवा पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी केले आहे.
हद्दपार व्यक्तीस पकडले
परभणी : परभणी जिल्ह्यातून हद्दपार केलेला आरोपी पुन्हा जिल्ह्याच्या हद्दीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रविवारी पोलीस पथकाने या आरोपीस ताब्यात घेऊन नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये हजर केले आहे.
नारायण चाळ रस्त्यावर खड्डे
परभणी : शहरातील नारायण चाळ भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. काही भागांत हा रस्ता पूर्णत: उखडून गेला असून, खड्डे चुकवत वाहन चालविताना अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने या भागातील खड्डे बुजवावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.