परभणी : शहरातील कचरा डेपो बोरवंड येथे स्थलांतरित करण्याचे आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करून धार रोड येथे कचरा टाकला जात असल्याची तक्रार माजी आ. विजय गव्हाणे यांनी केल्यानंतर या प्रकरणी विभागीय उपायुक्त अलीस गोरे यांनी मनपाच्या कचरा संकलन व प्रक्रिया पद्धतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.
परभणी शहरातील कचरा डेपो बोरवंड येथे स्थलांतिरत करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना दिले होते. मनपाच्या वतीने बोरवंड येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्पही उभारण्यात आला आहे. असे असताना मनपाने कचरा संकलन व विलगीकरणासाठी निवडलेली एजन्सी हा कचरा बोरवंड येथे न टाकता शहरातील धार रोड येथील अनधिकृत कचरा डेेपो येथे टाकत असल्याची तक्रार माजी आ. विजय गव्हाणे यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली होती. केंद्रेकर यांनी याची दखल घेऊन या कार्यालयातील नगर परिषद प्रशासन विभागाचे उपायुक्त अलीस गोरे यांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसारे गोरे यांनी १६ जून रोजी परभणी मनपा आयुक्तांना पत्र पाठविले असून, त्यामध्ये परभणी शहरात दररोज निर्माण होणारा कचरा, त्याचे संकलन, त्यावर कोठे व कशी प्रक्रिया केली जाते, याचा संपूर्ण वस्तुनिष्ठ व स्वयंस्पष्ट अहवाल छायाचित्रासह २१ जूनपर्यंत सादर करावा, तसेच नागरी घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत प्लास्टिक बंदी व इतर विषयांवर भर देऊन आपले शहर सुंदर व स्वच्छ करण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्याचे आदेशित करण्यात आले आहे.