परभणी : साडेचार लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात एसीबीच्या पथकाने निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या घरात ९ लाख ३१ हजार रुपयांची रक्कम रात्री उशिरा जप्त केली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना बुधवारी न्यायालयाने ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गंगाखेड येथील नगर विकास विभागाच्या निधीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दीड टक्के याप्रमाणे साडेचार लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्या प्रकरणी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपरिषद प्रशासन विभागातील अव्वल कारकून श्रीकांत करभाजने आणि गंगाखेड येथील नगरपालिकेच्या स्थापत्य अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खयूम यांना ८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते.
ही रक्कम उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी यांच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीच्या पथकाने त्यांनाही ताब्यात घेतले होते. या प्रकरणात रात्री उशिरा नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. मंगळवारी रात्री सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. एसीबीच्या एका पथकाने मंगळवारी रात्री उशिरा उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या परभणी येथील घराची झडती घेतली. त्यात ९ लाख ३१ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती एसीबीचे पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे यांनी दिली.
दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, अव्वल कारकून श्रीकांत करभाजने आणि स्थापत्य अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खयूम यांना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.