परभणी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या घटनेला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अद्यापही खुनाच्या सूत्रधारांना पकडण्यात आले नाही. या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने परभणीत २० ऑगस्ट रोजी सकाळी निर्भया मॉर्निंग वाॅक काढण्यात आला. डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या चारही गुन्ह्यांचे धागेदोरे एकमेकांत गुंतले आहेत. मात्र, अद्याप मूळ मारेकऱ्यांना पोलिसांनी पकडलेले नाही. यामुळे हे केवळ दहशतवादी कृत्य असल्याचे निवेदन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते राजगोपालाचारी उद्यानापर्यंत गुरुवारी सकाळी ७ वाजता हा मॉर्निंग वॉक काढण्यात आला. यामध्ये ॲड. माधुरी क्षीरसागर, गणपत भिसे, प्राचार्य प्रल्हाद पोटे, प्रवीण कनकुटे, पप्पू राज शेळके, सुनील जाधव, प्रा. चंद्रकांत गांगुर्डे, मुंजाजी कांबळे, शेख अलिमुद्दीन, ज्ञानोबा गायकवाड, शेख रफिक, विलास बाबर, रवी गायकवाड, ज्ञानोबा मुंडे, रवींद्र मानवतकर, धनश्याम साळवे यांचा सहभाग होता. वॉकनंतर जिल्हा प्रशासनाला पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले.
अनिसच्या निर्भय वाॅकला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:22 AM