लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : यावर्षी उन्हाळी हंगामात जायकवाडीचे पाणी कालव्यात सोडण्यात न आल्याने २५ हजार हेक्टरवरील शेती पडीक पडल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे़ पाण्याअभावी केळीच्या बागा करपल्या असून, ऊस जळून जात आहे़ त्याच बरोबर उन्हाळी हंगामातील पिके तर घेताच आली नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे़पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे २००६ मध्ये उच्च पातळी बंधारे बांधण्यात आले आहेत़ तर दुसºया बाजुने जायकवाडी धरणाचा डावा कालवा तालुक्यातून गेला आहे़ दोन्ही बाजुंनी सिंचन सुविधा उपलब्ध आहेत़ चांगल्या पाऊसकाळात या भागात मोठे सिंचन होत असे़ त्यामुळे बारमाही बागायती पिकेही घेतली जात होती़ एकेकाळी हा भाग सुजलाम सुफलाम असल्याचे दिसून येत होते़ मागील काही वर्षांत निसर्गाचे चित्र पालटले गेले आणि पावसाळ्यात पाहुण्यासारखा पाऊस बरसू लागला़ त्यामुळे या तालुक्यात मागील चार वर्षापासून शेतकरी दुष्काळाशी संघर्ष करीत असल्याचे दिसून येत आहे़ २०१७-१८ या वर्षात तालुक्यामध्ये पाऊस कमी झाला़ परंतु, जायकवाडीचे धरण हे १०० टक्के भरले गेले़ परिणामी परभणी जिल्ह्यातील रबी हंगामासाठी या धरणातून ३ आणि उन्हाळी हंगामात बारमाही व उन्हाळी पिकांसाठी ३ असे ६ पाणी आवर्तन जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आले होते़ यावर्षी तर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे़ मुदगल व ढालेगाव हे दोन्ही बंधारे कोरडेठाक पडले आहेत तर जायकवाडीचे पाणीही यावर्षी मिळाले नाही़परिणामी सिंचनाचे सर्व पर्याय बंद झाले़ या भागातील सिंचन आणि पिण्याचे पाणी जायकवाडीच्या पाण्यावरच अवलंबून असल्याचे वास्तव यावर्षी पुढे आले आहे़डाव्या कालव्यावर भिस्तजायकवाडीचा मुख्य डावा कालवा पाथरी भागातील वरखेड येथून सुरू होतो़ पाथरी उपविभागीय कार्यालयांतर्गत पाथरी, मानवत आणि परभणी तालुक्यातील काही भाग येतो़ जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर जिल्ह्यातील ३६ हजार हेक्टर क्षेत्राची मदार आहे़ त्यामुळे यावर्षी पाऊसच झाला नसल्याने बंधाºयाबरोबरच जायकवाडीतूनही पाणी मिळाले नाही़ त्यामुळे या ३६ हजार हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा सामना करावा लागला़
परभणी जिल्ह्यात जायकवाडीचे पाणी नसल्याचा परिणाम :२५ हजार एकरवरील शेती पडली पडीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:34 PM