सेलू : सततच्या पावसामुळे शेतातील उभ्या कापसाचे नुकसान झाल्याने एका ५५ वर्षीय शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची घटना निपाणी टाकळी शिवारात मंगळवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आले. कमलबाई बळीराम शिंपले (५५) असे मृत शेतकरी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सेलू पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
मानवत तालुक्यातील इरळद येथील शेतकरी महिला कमलबाई बळीराम शिंपले (५५) या १० ऑक्टोबर रोजी दुपारी निपाणी टाकळी शिवारातील स्वतः च्या शेतात पाहणीसाठी गेल्या होत्या. रात्री उशीर झाला तरीही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. मंगळवारी सकाळी निपाणी टाकळी शिवारातील त्यांच्या शेतात शोध घेतला असता तेथील चिंचेच्या झाडाला त्यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
सततच्या पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाल्याने कमलबाई चिंतेत होत्या. आर्थिक विवंचना आल्याने त्या नैराश्यात होत्या. यातूनच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कमलबाई यांचा मुलगा अर्जुन बळीराम शिंपले यांनी सेलू पोलीसात दिली आहे. यावरून सेलू पोलीस स्थानकात आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोडतीर्थ पोलीस कर्मचारी सुनील वासलवार यांनी जाऊन पंचनामा केला आहे. अधिक तपास बीट जमादार शेख गौस हे करत आहेत.