शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत काही भागांत ऑटोरिक्षांचे पॉइंट लावले असून, या पॉइंटवरून किंवा पॉइंटच्या समोर चौकांमध्ये प्रवासी मिळविण्यासाठी बिनधास्तपणे ऑटोरिक्षा रस्त्यावर उभे केले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे तर निर्माण होतातच, शिवाय अपघात होण्याची भीतीही निर्माण होत आहे. अनेक वेळा विरुद्ध दिशेला सर्रास ऑटोरिक्षा वळविले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. जनता मार्केट, गुजरी बाजार, शनिवार बाजार, गांधी पार्क या परिसरात हा प्रकार नित्याचा झाला आहे.
बसस्थानक
या परिरात बसस्थानकातून येणाऱ्या प्रवाशांना घेण्यासाठी कुठेही ऑटोरिक्षा उभे केले जात आहेत. मुख्य रस्त्यावर ऑटोरिक्षा उभे करण्यात येत असून, अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानकातही ऑटोरिक्षाचा पॉइंट असताना प्रवेशद्वारासमोर रिक्षा उभी केली जाते. त्यामुळे स्थानकातून प्रवाशांना बाहेर पडताना ऑटोरिक्षाचा अडथळा पार करावा लागत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
जनता मार्केट
शहरातील जनता मार्केट भागात रस्ता अरुंद असून, अनेक ग्राहक या ठिकाणी खरेदीसाठी येतात. याच भागात ऑटोरिक्षा उभे करून प्रवासी मिळविले जात आहेत. त्यामुळे एकच गर्दी होते. अनेक वेळा वाहतूकही ठप्प होते. त्याचा त्रास इतर वाहनधारकांना होत आहे.
रिक्षा भाड्यात वाढ
मागील वर्षभरात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे ऑटोरिक्षा चालकांनी भाडेवाढ केली आहे.
बसस्थानकापासून शहरातील विविध भागांत प्रवाशांना सोडविण्यासाठी पूर्वी असलेल्या दरामध्ये ५ ते १० रुपयांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे हे दर निश्चित नाहीत.
त्यामुळे ठरावीक चौकापर्यंतचे दर निश्चित असले तरी चौकातून वसाहतीमध्ये घरापर्यंत सोडण्यासाठी मात्र रिक्षाचालकांच्या मनाचे भाडे आकारले जाते.
वाहतुकीला अडथळा
शहरात वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून निर्माण झाली आहे. सर्वसाधारण वाहनधारकांबरोबरच ऑटोरिक्षा चालकही अनेक वेळा वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे जागोजागी वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत.
प्रवासी मिळविण्यासाठी अनेक वेळा चढाओढ होते. वाटेतून एखाद्या प्रवाशाने हात दाखविला की सर्रास त्याच ठिकाणावरून ऑटोरिक्षा वळविला जातो. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.
- अरुण पवार