पालम (परभणी) - शहरापासून वाहणाऱ्या लेंडी नदीला पूर आल्याने पहाटे चार वाजल्यापासून 12 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या गावातील नागरिक अडकून पडले असून दुपारी दोन वाजेपर्यंत पूर ओसारण्याची शक्यता आहे. तालुक्यातील कमी उंचीच्या पुलामुळे या गावांना दरवर्षी पुराचा फटका बसत आहे.
पालम ते जांभुळबेट रस्त्यावर शहरापासून अर्धा किमी अंतरावर लेंडी नदीच्या पात्रात जुना कमी उंचीचा पूल असून या पूलाच्या नळ्या चिखलाने भरून गेले आहेत. त्यामुळे पाऊस पडताच या पुलावरून पाणी वाहत सुरुवात होते पाण्याचा वेग जास्त असल्याने पुलावरून जाता येत नसल्याने वाहतूक ठप्प होत आहे. 31 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पाऊस पडल्याने नदीला पूर येऊन हा रस्ता बंद पडला आहे. पहाटे चारपासून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली असून पुलावरून पाच फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे फळा आरखेड घोडा सोमेश्वर उमरथडी या गावांचा संपर्क तुटलेला आहे. याच नदीवर पालम ते पुयनी या दरम्यान ही कमी उंचीचा पूल आहे. या ठिकाणी रस्त्याच्या बरोबर पाणी आल्याने या मार्गावरील पुयनी आडगाव वनभुजवाडी ते लजापूर नावा नावलगाव कांदलगाव व खडी या गावाचा रस्ता बंद झालेला आहे. दोन्ही ठिकाणी एकच नदी असल्याने पुराचा फटका या गावांना बसत आहे.