परभणी : येथील रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच प्रिमीयम पार्किंग सुरू करण्यात आल्याने प्रवाशांना मात्र स्थानकात प्रवेश करताना वाहनांचे अडथळे पार करावे लागत आहेत.
येथील रेल्वेस्थानकावर प्रवाशांना अडथळा होऊ नये यासाठी नो- पार्किंग झोन तयार करण्यात आले. या भागात एकही वाहन लावले जावू नये आणि प्रवाशांना स्थानकात प्रवेश करणे सुकर व्हावे, या उद्देशाने नो- पार्किंग झोन बनविण्यात आले होते. मात्र, मागील काही वर्षांपासून प्रिमीयम पार्किंग सुरू करण्यात आली असून, स्थानकावर प्रवाशांना सोडविण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांकडून प्रतिघंटा दहा रुपये याप्रमाणे शुल्क आकारून वाहन उभे केले जात आहे. मागील वर्षी ही प्रिमीयम पार्किंग सुरू करण्यात आली होती. मध्यंतरी कोरोनाच्या संसर्गामुळे रेल्वे वाहतूक बंद असल्याने प्रिमीयम पार्किंगही बंद ठेवली होती. परंतु, आता पुन्हा रेल्वे सुरळीत सुरू झाली असून, स्थानक परिसरात प्रिमीयम पार्किंगही सुरू करण्यात आली आहे. परंतु, वाहने उभी करताना ती चुकीच्या पद्धतीने उभी केली जातात. प्रिमीयम पार्किंगमुळे प्रवाशांना स्थानकात प्रवेश करतानाच अनेक अडथळे पार करावे लागत आहेत. विशेष म्हणजे, मुख्य प्रवेशद्वारासमोरच बॅरीकेटस् लावण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेगाडी पकडण्यासाठी धावपळ करताना प्रवाशांना वाहनांचे अडथळे पार करावे लागत आहेत. नागरिकांनी प्रिमीयम पार्किंगला विरोध केला नाही. परंतु, ही पार्किंग प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरू नये, अशी मागणी होत आहे. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारापासून दूर अंतरावर वाहनतळाची सुविधा करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
प्रवाशांचा त्रास कायमच
परभणी येथील रेल्वेस्थानकावरून दररोज २० ते २५ रेल्वेगाड्या धावतात. त्यातून साधारणत: ५ हजारांपेक्षा अधिक प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. प्रवाशांना स्थानकात प्रवेश करताना अडथळे निर्माण होवू नये, या उद्देशाने रेल्वेस्थानकाच्या समोरील भाग नो-पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. पूर्वी या भागात वाहन उभे केल्यास वाहनचालकाला दंड आकारला जात होता. परंतु, आता सर्रास वाहनचालकांकडून पावती घेत वाहने उभी केली जात आहेत. या तात्पुरत्या वाहनतळासाठी वेगळी पर्यायी जागा निवडावी, अशी नागरिकांची मागणी आहे.