परभणी : शहरातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या अडचणी वाढत चालल्या असून या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास रस्त्यावर ठिय्या मारून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अपना कॉर्नर ते जेल कॉर्नर हा शहरातील मुख्य रस्ता आहे. मात्र सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने वाहने चालविणे तर सोडाच पायी चालणेदेखील अवघड झाले आहे. नानलपेठ भागातील नागरिकांसाठी हा रस्ता मुख्य रस्ता असून खड्ड्यामुळे दररोज अपघात होत आहेत. यापूर्वी या रस्त्यावर दोन विद्यार्थी आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. रस्त्याची दुरवस्था झाली असतानाही महानगरपालिका प्रशासन मात्र दुरुस्तीकडे कानाडोळा करीत आहे. तेव्हा या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार दिलीप माने, सतीश कहात, कदीर खान आदींनी दिला आहे.
शहरातील वर्दळीचा मार्ग
अपना कॉर्नर ते जेल कॉर्नर हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. पोलीस मुख्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जि.प. कार्यालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा कारागृह या मुख्य कार्यालयांबरोबर तीन ते चार शाळा या मार्गावार आहेत.त्यामुळे या रस्त्याने मोठी वाहतूक असते. रस्ता खराब झाल्याने नागरिक त्रस्त आहेत.