गंगाखेड ते परभणी राज्य मार्ग २४८ ला जोडण्यासाठी तालुक्यातील नागठाणा पाटी ते सुनेगाव, मुळी मार्गे धारखेडकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत सुरू आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या या रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच डांबरीकरण झालेला रस्ता जागोजागी उखडल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून समोर आले होते. त्यानंतर याबाबतचे वृत्त ११ फेब्रुवारी रोजीच्या ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल घेत संबंधित कंत्राटदाराने धारखेड ते मुळी, अंगलगाव रेल्वे फाटक कॉर्नर व त्यापुढे सुनेगावाकडे जाणाऱ्या जागोजागी उखडलेल्या रस्त्यावर कंत्राटदाराने खडी व डांबराचे पॅच मारून ठिगळं लावत काम पूर्ण होण्याआधीच खराब झालेला हा रस्ता पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे चित्र १४ फेब्रुवारी रोजी केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. तर या रस्त्यावर धारखेड ते मुळी दरम्यान असलेल्या दोन नळकांडी पुलांसह राज्य मार्ग २४८ महातपुरी फाटा ते भांबरवाडी गावा दरम्यानच्या भांबरवाडी रस्त्यावर सुरू असलेल्या नळकांडी पुलांच्या कामाचा दर्जा मात्र काही सुधारत नसल्याचे चित्रही रविवारी या रस्त्याची पाहणी करतांना स्पष्टपणे दिसून आले आहे. गंगाखेड तालुक्यातील भांबरवाडी, दुस्सलगाव व नागठाणा पाटी ते धारखेड या गावांना राज्य मार्गाशी जोडण्याकरिता मुख्यमंत्री सडक योजनेच्या निधीतून सुरू असलेल्या कामांकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन कामांचा दर्जा सुधारावा, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांतून केली जात आहे.
नागठाणा पाटी ते धारखेड रस्त्याला खडी, डांबरची ठिगळं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:18 AM