परभणी: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी संभाजी सेनेच्या वतीने परभणी- गंगाखेड या रस्त्यावरील ब्राह्मणगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागले आहेत. मराठवाड्यातील बहुतांश भागात २१ दिवसापेक्षा अधिक दिवस पाऊस झालेला नाही. बऱ्याच भागात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून सुद्धा त्यांची पिके करपत आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला तात्काळ मदत करावी, यासाठी मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपयांची मदत करावी, पिक विम्याच्या २५ टक्के अग्रीम तत्काळ देण्यात यावा, जिल्ह्यातील ५२ मंडळांनाही अग्रीम लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी संभाजी सेनेच्या वतीने ब्राह्मणगाव फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, शहराध्यक्ष अरुण पवार, नारायण देशमुख, प्रताप पवार, सोनू पवार, गजानन शिंदे, कुणाल गायकवाड यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.