१८ रस्त्यांवरील वाहतूक ठप्प
अतिवृष्टीने जिल्ह्यातील १८ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. परभणी-सेलू रस्त्यावर ढेंगळी पिंपळगाव येथे पुलावरून पाणी वाहत आहे. तसेच वालूर-मानवत, पाथरी तालुक्यातील पाथरी-सेलू, पाथरी-सोनपेठ, पाथरी-पोखर्णी, पाथरी-आष्टी, पाथरी-परभणी, पालम तालुक्यात परभणी-पालम, पालम-जांभूळबेट, केरवाडी-सायाळा, पूर्णा तालुक्यात पिंगळगड नदीला पूर आल्याने पूर्णा-ताडकळस, पूर्णा नदीला पूर आल्याने पूर्णा-परभणी, मानवत तालुक्यातील परभणी-मानवत या राष्ट्रीय महामार्गावर ताडबोरगावजवळ ओढ्याला पूर आल्याने मानवत-परभणी, सोनपेठ तालुक्यात शेळगाव-उक्कलगाव, गंगाखेड तालुक्यात गंगाखेड ते परभणी, जिंतूर तालुक्यातील जिंतूर-परभणी, जिंतूर-पाचलेगाव या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली.
गोदावरी, पूर्णा दुथडी
अतिवृष्टीमुळे गोदावरी आणि पूर्णा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील कंठेश्वर येथे गोदावरी नदीत इतर नद्या मिसळत असल्याने पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्णा नदी ६ मीटरने वाहत आहे.
या प्रकल्पांचे उघडले दरवाजे
सोनपेठ तालुक्यातील खडका बंधाऱ्याचे १३ पैकी १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याचे ३, मुदगल व तारुगव्हाण बंधाऱ्याचे प्रत्येकी २ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. पाथरी तालुक्यातील तिन्ही बंधाऱ्यांमध्ये मिळून ६८ हजार २५० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.
३२ गावांचा तुटला संपर्क
जिंतूर तालुक्यातील पाचलेगावात पुराचे पाणी शिरले असून, १४ तासांपासून गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच सेलू तालुक्यातील कुपटा, पालम तालुक्यातील १० गावे, सोनपेठ तालुक्यातील ७ गावे, गंगाखेड तालुक्यातील ७, जिंतूर तालुक्यातील १३ गावांचा संपर्क तुटला होता.