शहरातील वाहनधारकांना पावसाळ्यात रस्त्याने मार्ग काढताना चांगलीच कसरत करावी लागली. यात प्रशासकीय इमारत ते नारायण चाळ, नारायण चाळ ते बाजार समिती रस्ता, वसमत रस्ता, बाजार समिती परिसरातील रस्ते, हडको, धाररोड, नानलपेठ, पेडगाव रोड, सुपर मार्केट ते वसमत रोड, जेल रोड यासह डम्पिंग ग्राउंड परिसरातील रस्ता तसेच देशमुख हॉटेल ते सुपर मार्केट, उघडा महादेव मंदिर ते औद्योगिक वसाहत या व अन्य वसाहतीतील रस्त्यांवर सध्या जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे मनपा प्रशासनाचे लक्ष नाही. परिणामी, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन खड्ड्यांचा त्रास सहन करीत ये-जा करावी लागत आहे.
पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा विसर
शहरात पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिका अनेक रस्त्यांची डागडुजी तात्पुरत्या स्वरूपात वार्षिक निधीतून करते. परंतू, यावर्षी अनेक रस्त्यावर ही डागडुजी करण्याची गरज असतानाही मनपाने त्याची तसदी घेतली नाही. यामुळे अख्खा पावसाळा पाण्यातून मार्ग काढत नागरिकांना घालवावा लागला.
या रस्त्यावर साचते पावसाचे पाणी
वसमत रोड परिसरातील कब्रस्तान ते शिवाजीनगर मार्ग, दादाराव प्लॉट, काद्राबाद प्लॉट, संभाजीनगर, देशमुख गल्ली ते सुपर मार्केट, नारायण चाळ ते स्टेडियम परिसर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील स्टेडियम मार्ग, डॉक्टर लेन, स्टेशन रोड या ठिकाणच्या रस्त्यावर नेहमीच पाऊस पडला की पाणी साचते.
मिरवणूक मार्गावर टाकली माती
यंदा गणपती विसर्जनाच्या मिरवणुका मुख्य मार्गाने निघाल्या नाहीत. मिरवणुकांना बंदी असल्याने महापालिकेनेही पूर्ण मार्गाची दुरुस्ती तसेच खड्डे बुजविण्याची तसदी घेतली नाही. केवळ नारायण चाळ ते अष्टभूजा देवी मंदिर, शिवाजी चौक या मार्गावर काही ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे माती टाकून बुजविण्यात आले आहेत.
जुना पेडगाव रोड भागात चालणेही कठीण
शहरातील महाराणा प्रताप चौक ते जुना पेडगाव रोड या मार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे. यातच या ठिकाणी अनेक खड्डे पडल्याने व मार्ग खराब झाल्याने रस्त्यावर पायी चालणे कठीण होऊन बसले आहे. अशीच स्थिती महाराणा प्रताप चौक ते अपना कॉर्नर या रस्त्याची झाली आहे. आठ दिवसापूर्वी देशमुख हॉटेल ते उघडा महादेव मंदिर या रस्त्याच्या कामासाठी भरपावसात लोटांगण आंदोलन करूनही महापालिकेला जाग आली नाही. त्यामुळे अन्य भागातही वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
पाठीचे, मणक्याचे त्रास वाढले
दुचाकीवर जाताना असा एकही रस्ता नाही जिथे एकही खड्डा लागणार नाही. या खड्ड्यातून जाताना अनेकांना पाठीचे, मणक्याचे आजार होत आहेत. तसेच दुचाकी दुरुस्तीचा खर्चही वाढला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक यांना हा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे.