परभणी : पिंपळदरी ते सुपा रस्त्यावर डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ मार्च रोजी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. यांच्याकडून १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन आरोपींवर पिंपळदरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी ते सुपा रस्त्यावरून २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास अमित अशोक सोनकांबळे हे फायनान्सची वसुली करून गंगाखेड शहराकडे दुचाकीवरून येत होते. तेव्हा पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन इसमांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. तेव्हा हे अमित सोनकांबळे खड्ड्यात पडले. त्यानंतर, अनोळखी आरोपीने त्यांच्याजवळील ९१ हजार ४०० रुपये नगदी व एक मोबाइल असा एकूण ९७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी २ अज्ञाताविरुद्ध पिंपळदरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, ६ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या आरोपींबाबत गुप्त माहिती मिळाली.
त्यानंतर, जयवंत गायकवाड (रा.रुई ता.कंधार, जि.नांदेड), मोहम्मद समरुद्दीन मोहम्मद गुलाम दस्तगीर (३६, रा.कोर्ट बाजार, ता.कंधार, जि.नांदेड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकीसह १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पी.डी. भारती, दिनेश सूर्यवंशी, गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार, विलास सातपुते, सिद्धेश्वर चाटे, विष्णू चव्हाण, नामदेव दुबे, मधुकर ढवळे, राम पोळ, बाळासाहेब तुपसुंदरे, रवी जाधव, सचिन भदर्गे, रंगनाथ दुधाटे, राहुल परसोडे, दिलावर पठाण आदींच्या पथकाने केली.